Ratan Tata : रतन टाटांची ३८०० कोटींची संपत्ती कोणाची होणार? टाटांचं मृत्युपत्र आलं समोर…

नवी दिल्ली : रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्रातील खूप मोठं नाव आहे. त्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने फक्त भारताचे नाही तर संपूर्ण जगाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रतन टाटा किती उदार व्यक्ती होते हे त्यांच्या मृत्युपत्रावरून समोर आले आहे. त्यांनी घरकाम करणाऱ्या नोकरासाठी आणि ऑफिस स्टाफसाठी सुमारे ३.५ कोटी रुपये दिले आहेत.
यामध्ये कार क्लिनरपासून ते शिपाईपर्यंत सर्वांचा समावेश आहे. रतन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना आणि अगदी शेजाऱ्यांना दिलेले कर्जही माफ केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्यांना त्यांच्या घरातील नोकरांना त्यांच्या सेवेच्या वर्षांच्या प्रमाणात १५ लाख रुपये वाटण्याचे निर्देश दिले.
तसेच, अर्धवेळ मदतनीस आणि कार क्लीनरनाही १ लाख रुपये देण्यास सांगण्यात आले आहे. त्यांचे सर्व कपडे स्वयंसेवी संस्थांना दिले जातील जेणेकरून ते गरजूंमध्ये वाटू शकतील. टाटा डॅक्स, पोलो, ब्रूक्स ब्रदर्स, ब्रायोनी आणि हर्मीस सारख्या ब्रँडचे कपडे घालायचे.
शंतनू नायडूचे १ कोटीचे कर्ज माफ
एका वृत्तपत्रानुसार, टाटांनी त्यांचे दीर्घकाळचे स्वयंपाकी राजन शॉ यांना १ कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे दिले आहेत. यामध्ये ५१ लाख रुपयांची कर्जमाफी देखील समाविष्ट आहे. त्यांनी त्यांच्या बटलर सुब्बैया कोनार यांना ६६ लाख रुपये दिले आहेत, ज्यामध्ये ३६ लाख रुपयांची कर्जमाफी देखील समाविष्ट आहे. त्यांनी त्यांचे सेक्रेटरी दिलनाज गिल्डरलाही १० लाख रुपये दिले आहेत. टाटा यांनी त्यांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांना कॉर्नेल विद्यापीठात एमबीए करण्यासाठी दिलेले १ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. तसेच ड्रायव्हर राजू लिओन याला १.५ लाख रुपये दिले आणि १८ लाख रुपयांचे कर्ज माफ केले.
जर्मन शेफर्डसाठी १२ लाख
तसेच टाटा ट्रस्टचे सल्लागार होशी डी मालेसर यांना 5 लाख, त्यांच्या अलिबाग बंगल्याचे केअरटेकर देवेंद्र कटमोल्लू यांना 2 लाख, स्वीय सहाय्यक दीप्ती दिवाकरन यांना 1.5 लाख आणि शिपाई गोपाल सिंग आणि पांडुरंग गुरव यांना प्रत्येकी 50,000 दिले आहेत. तसेच त्यांच्या एका सहाय्यक सरफराज देशमुख यांचे २ लाख रुपयांचे कर्जही माफ केले. जर्मन शेफर्ड टिटोसाठी १२ लाख रुपये दिले आहेत, ज्यामध्ये ३०,००० रुपयांचे तिमाही हप्ते समाविष्ट आहेत. टिटो अजूनही राजन शॉच्या देखरेखीखाली आहे.
टाटा यांनी त्यांचे शेजारी जेक मॅलेट यांना वॉरविक बिझनेस स्कूल, यूके येथून एमबीए करण्यासाठी दिलेले २३.७ लाख रुपयांचे कर्जही माफ केले. मालिते सध्या स्वित्झर्लंडमध्ये राहते. टाटांच्या उर्वरित मालमत्तेपैकी एक तृतीयांश (शेअर्स आणि रिअल इस्टेट वगळता) ताजच्या माजी कर्मचारी मोहिनी दत्ता यांना देण्यात आला आहे. सेशेल्समधील त्यांची ८५ लाख रुपयांची जमीन सिंगापूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या आरएनटी असोसिएट्स या फंडला देण्यात आली आहे. त्याच्या भागधारकांमध्ये टाटा ट्रस्टचे माजी व्यवस्थापकीय विश्वस्त आर वेंकटरमण आणि टाटा टेक्नॉलॉजीजचे माजी सीईओ पॅट्रिक मॅकगोल्ड्रिक यांचा समावेश आहे.





