‘भाऊ जाऊन वर्ष झाले आणि…’ रतन टाटांच्या बहिणींकडून चिंता व्यक्त; म्हणाल्या- ‘टाटा ट्रस्ट धोक्यात’

नवी दिल्ली: टाटा समूहाचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होताच, आता टाटा समूहातील अंतर्गत वाद (tata trusts controversy) चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यावर खुद्द रतन टाटा यांच्या बहिणींनी, शिरीन जिजीभॉय (Shireen Jejeebhoy) आणि डीनना जिजीभॉय (Deanna Jejeebhoy) यांनी उघडपणे चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ‘टाटा ट्रस्ट’चे भविष्य धोक्यात दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिंट वृत्तपत्राच्या अहवालानुसार, रतन टाटा यांच्या निधनानंतर दोन्ही बहिणींनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत रतन टाटांना ज्या गोष्टीची सर्वाधिक काळजी होती, ती म्हणजे ‘टाटा ट्रस्ट’चे भविष्य, आणि आता तेच धोक्यात आले आहे.
मेहली मिस्त्री यांना हटवल्याने नाराजी –
टाटा ट्रस्ट्समधून रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी मेहली मिस्त्री यांना गेल्या आठवड्यात काढून टाकण्यात आले. त्यांचा कार्यकाळ वाढवण्यास तीन विश्वस्त- नोएल टाटा, वेणु श्रीनिवासन आणि विजय सिंह यांनी मान्यता दिली नाही. तर प्रमित झावेरी, डेरियस खंबाटा आणि जहांगीर यांनी मिस्त्रींना पाठिंबा दिला. रतन टाटांचे बंधू जिमी यांनी मतदानात भाग घेतला नाही. एकमत न झाल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.
ट्रस्टची चिंता टाटांना सर्वाधिक –
याबद्दल बोलताना शिरीन जिजीभॉय म्हणाल्या, “रतन यांना अनेक चिंता होत्या, पण ट्रस्ट्सचे भविष्य ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी चिंतेची बाब होती.” तर डीनना जिजीभॉय भावूक होत म्हणाल्या, “भाईला जाऊन फक्त एक वर्ष झाले आहे आणि त्यांची आठवण, त्यांचा वारसा आणि टाटा मूल्ये धोक्यात आलेली दिसत आहेत.”
डीनना यांनी सांगितले की, रतन टाटांचा मेहली मिस्त्री, टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन आणि डेरियस खंबाटा या तिघांवर सर्वाधिक विश्वास होता. शिरीन यांच्या मते, मेहली मिस्त्री हे केवळ सल्लागार नसून रतन यांचे जवळचे मित्र होते. ते निर्भीडपणे त्यांच्या निर्णयांवर असहमती दर्शवत असत, आणि टाटांना विश्वास होता की मिस्त्री ट्रस्ट्समध्ये योग्य ‘गव्हर्नन्स’ (Governance) राखतील.
नोएल टाटांचा वाढता प्रभाव –
मेहली मिस्त्री यांना हटवल्यानंतर ट्रस्टमध्ये रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची पकड मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. रतन टाटांच्या निधनानंतर दोनच दिवसांनी नोएल यांचे नाव ट्रस्ट्सचे अध्यक्ष म्हणून प्रस्तावित करण्यात आले होते, असेही बोलले जात आहे.
या संवादात दोन्ही बहिणींनी स्पष्ट केले की, रतन टाटांचा कधीही या गोष्टीला पाठिंबा नव्हता की टाटा कुटुंबातील व्यक्तीनेच ट्रस्ट्स किंवा समूहाचे नेतृत्व करावे. डीनना म्हणाल्या, “रतन यांचा विश्वास गुणवत्तेवर होता. त्यांचे म्हणणे होते- ‘कमवा, मग मिळवा’ (कमाओ, तब पाओ).” तर शिरीन यांनी सांगितले, “चंद्रशेखरन हे योग्य असल्यामुळे ते अध्यक्ष झाल्याने रतन खुश होते, ते कोणत्याही घराण्यातील आहेत म्हणून नाही.”
शांतता परतण्याची शिरीन यांना आशा –
रतन टाटा यांच्या बहिणींनी सांगितले की, त्या कोणताही सल्ला देत नाहीयेत, त्यांना फक्त एवढेच हवे आहे की रतन टाटांचा वारसा आणि मूल्ये सुरक्षित राहावीत. शिरीन यांनी दुःख व्यक्त केले, “वर्तमानपत्रांत अशा बातम्या वाचणे वेदनादायक आहे. पण आम्हाला आशा आहे की, लवकरच शांतता परत येईल.”
सध्या टाटा समूहातील हा वाद केवळ पद आणि सत्तेचा नसून, रतन टाटांची विचारसरणी, त्यांची मूल्ये आणि त्यांनी मागे सोडलेला वारसा जपण्याचा प्रश्न बनला आहे.





