झारखंडमध्ये कोणाची येणार सत्ता? एक्झिट पोलद्वारे माहिती समोर…

Jharkhand Election 2024 Exit Poll | झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्व वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांचे सात एक्झिट पोल आले आहेत. त्यापैकी चारमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 40 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यापूर्वीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे
झारखंड मुक्ती मोर्चाच्या प्रवक्त्या डॉ. नीलम मिश्रा म्हणाल्या की, निवडणुकीच्या काळात आम्ही दुर्गम ग्रामीण भागात गेलो आहोत. हेमंत सोरेन यांच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास होता. सोरेन यांनी प्रत्येक स्तरातील आणि वर्गातील लोकांना योजनांद्वारे जोडण्याचे केलेले काम खूप प्रभावी होते आणि ते तुम्हाला दिसेल. तुम्ही २३ नोव्हेंबरची वाट पहा आणि झारखंडमध्ये आम्ही सरकार स्थापन करणार आहोत. झारखंडमध्ये भाजपचा अजेंडा उलटेल, असा विश्वासही डॉ. नीलम मिश्रा यांनी व्यक्त केला.
त्यांनी भाजपला प्रत्युत्तर देताना सांगितले की, निर्दोष असलेल्या आदिवासी मुख्यमंत्र्यांना अटक करणे अत्यंत घातक आहे. भाजपने नेहमीच जनभावनांशी खेळ केला आहे. भाजपने येथील आदिवासींशी खेळ केला आणि एका मुख्यमंत्र्यांना अटक केली. तसेच भाजप फूट पाडण्याचे राजकारण करत असून त्यांनी दिलेला बेटी-माटी-रोटीचा नारा उलटला आहे. येथील प्रादेशिक नेत्यांना भाजपाने बॅकफूटवर ठेवले होते. Jharkhand Election 2024 Exit Poll |
भाजपचे प्रवक्ते गौरव वल्लभ म्हणाले की, हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यावर एका आदिवासी व्यक्तीला मुख्यमंत्री केले गेले. पण तुरुंगातून आल्यानंतर 48 तासही तुम्हाला खुर्चीशिवाय राहता आले नाही. लगेच तुम्ही चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदावरून हटवले. आदिवासी म्हणजे फक्त हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी, असे काही आहे का? जेव्हा काँग्रेसच्या एका विद्यमान मंत्र्याने हेमंत सोरेन यांच्या कुटुंबातील महिलेसाठी शब्द वापरले, तेव्हा त्यांनी हसत हसत ते घेतले. काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरात 400 कोटी रुपये सापडले, हे आपण विसरलो आहोत का? जनता काहीही विसरलेली नाही. निवडणुकीच्या दोन महिने आधी ही माया योजना कशी आठवली?, असा सवालही त्यांनी केला आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी
– टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार झारखंडमध्ये एनडीए सरकारला ४० ते ४४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, जेएमएमच्या इंडिया आघाडीला ३० ते ४० जागा मिळण्याची शक्यता आहे.
– चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला ५० जागा, तर इंडिया आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर स्थानिक पक्ष आणि अपक्षांना ३ ते ५ जागा मिळू शकतात.
– पिपल्स पल्सनुसार एनडीएला ४२ ते ४८ जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला १६ ते २३ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला ८ ते १४ जागा मिळू शकतील.
– अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया आघाडी ही 53 जागा तर एनडीए 25 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर जेएलकेएमला दोन आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज या एक्जिट पोलने वर्तवला आहे.
दरम्यान, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 38 मतदारसंघांमध्ये सुमारे 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा:
रश्मिका मंदान्नासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान विजय देवरकोंडाने रिलेशनशिप केलं कन्फर्म





