पुण्याचा ‘कारभारी’ कोण? महापौरपदाची लॉटरी आज मुंबईत निघणार; इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहराचा प्रथम नागरिक कोण, हे आज निश्चित होणार आहे. महापौरपदासाठी आज मुंबईत लाॅटरी काढली जाणार असून, त्यात निघणाऱ्या आरक्षणावर महापौरपदाचे दावेदार निश्चित होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.महापालिका आरक्षण सोडत निघताच पालिका प्रशासनाकडूनही तत्काळ महापौरपदासाठीची मुख्य सभा बोलविली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेली गटनोंदणी सर्व पक्षांकडून विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
ही निवड जानेवारी महिना संपण्याच्या आतच घेण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली असून, त्याबाबत पक्षातील नगरसेवकांना सांगण्यात येत आहे.महापालिका निवडणुकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झालेला असला, तरी महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनासही सभागृह सुरू करण्यासाठी काहीच करता आलेले नाही.
निकालानंतर आता प्रत्येक पक्षाची गटनोंदणी विभागीय आयुक्तांकडे झालेली असली, तरी केवळ आरक्षण नसल्याने सभा बोलविणे शक्य नाही. त्यामुळे गुरुवारी आरक्षणाची सोडत निघताच प्रशासनाकडून तत्काळ विभागीय आयुक्तांना पत्र देऊन महापौर निवडीचा कार्यक्रम कळविला जाणार आहे. त्यासाठी सात ते नऊ दिवसांची आवश्यकता असते. त्यामुळे प्रशासनाने तयारी पूर्ण करून ठेवली असून, आता आरक्षण सोडतीची प्रतीक्षा आहे.
भेटीगाठींना आला वेग
महापौरपदाचे आरक्षण ओबीसी किंवा एससी महिला किंवा पुरुष असे असणार आहे. त्यामुळे या प्रवर्गातून संधी मिळावी, यासाठी इच्छुकांकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय अनेकांनी आपल्या कामांचा लेखाजोखा तयार केला असून, तो नेत्यांपर्यंत,
तसेच सोशल मीडियातूनही जाहीर केला जात आहे. पक्षाकडूनही यापूर्वीच कोणते आरक्षण पडल्यास संधी कोणाला असेल, याची यादी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यादीत कोणाची नावे आहेत, हे शोधण्यासाठी इच्छुकांकडून धडपड सुरू आहे.


