BMW Accident: जयपूरचे उद्योजक आणि शकुन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक वल्लभ माहेश्वरी (वय ६२) यांचे ८ मार्च रोजी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. जाहिरात, संचार, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये ३२ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या माहेश्वरी यांच्या अकाली निधनाने उद्योग आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. धार्मिक यात्रेदरम्यान झाला अपघात – माहेश्वरी हे ८ मार्चच्या सायंकाळी आपल्या चालकासह जयपूरहून मथुरेला धार्मिक यात्रेसाठी निघाले होते. अलवारजवळ दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर त्यांची BMW कार अचानक नियंत्रण सुटल्याने महामार्गाचे बॅरिकेडिंग तोडून मधल्या विभाजकावरून गेली आणि एका कल्व्हर्टच्या भिंतीला जाऊन धडकली. माहेश्वरी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले. अपघातात त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. १२ कंपन्यांशी होते संबंध – Mint च्या वृत्तानुसार, IndiaFilings च्या कॉर्पोरेट नोंदींनुसार माहेश्वरी यांचा निधनाच्या वेळी सुमारे १२ कंपन्यांशी संबंध होता. यामध्ये SGM Buildcon, Shakun Communication Infrastructure, Shakun Advertising, Manokamna Real Estate, N.S. Publicity India आणि Shakun Hotels and Resorts Private Limited यांचा समावेश होता. याशिवाय ते Shakun Fort and Palace LLP आणि Shakun Realty LLP मध्येही भागीदार होते. त्यांच्या दोन प्रमुख कंपन्यांची आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील एकत्रित महसूल १०० कोटी रुपयांहून अधिक होता, यावरून त्यांच्या व्यावसायिक विस्ताराची व्याप्ती लक्षात येते. हेही वाचा – शेअर बाजारात मोठी घसरण माजी मुख्यमंत्री गेहलोत यांनी व्यक्त केला शोक – माहेश्वरी यांच्या निधनाची बातमी समजताच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी X (पूर्वीचे Twitter) वर शोक व्यक्त केला. “उद्योजक श्री वल्लभ माहेश्वरी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. दिवंगत आत्म्यास शांती आणि कुटुंबास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,” असे त्यांनी म्हटले. उत्तराधिकाराचा प्रश्न ऐरणीवर – माहेश्वरी यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यापक जबाबदाऱ्या कोण सांभाळणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात अशा प्रमुख व्यक्तींच्या निधनानंतर अनेकदा कुटुंबात वाद आणि न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात, जसे २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स ग्रुपमध्ये आणि गेल्या वर्षी सोना कॉमस्टारमध्ये संजय कपूर यांच्या निधनानंतर घडले होते.