दिल्लीला जाणं सोपं होणार! 2024मध्ये हे पाच नवीन महामार्ग होणार सुरू

नवी दिल्ली – देशात महामार्ग नेटवर्क 2024 मध्ये आणखी विस्तारले जाणार असून पुढील वर्षी किमान पाच नवीन महामार्ग वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडियाने पुढच्या वर्षी बांधल्या जाणार्या नवीन एक्स्प्रेस-वेची संख्या सूचीबद्ध केली आहे. यातील काही लवकरच कार्यान्वित होतील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. 2024 च्या उन्हाळ्यापर्यंत आणि लोकसभा निवडणुकीच्या सुमारास काही प्रमुख महामार्ग प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वे हा भारतातील बहुप्रतिक्षित सर्वात लांब एक्सप्रेस-वे आहे. हा महामार्ग देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानीला जोडणार आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल. हा एक्स्प्रेस वे पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत कार्यान्वित होण्याची आशा आहे. सध्या, हरियाणातील सोहना आणि राजस्थानमधील दौसा दरम्यान एक्सप्रेसवेचा पहिला विभाग कार्यरत आहे, जो अंदाजे 209 किलोमीटर लांबीचा आहे. एकूण 1,386 किमी अंतर असलेला हा द्रुतगती मार्ग दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधून जाणार आहे.
दिल्लीतील सर्वात लहान भाग नऊ किलोमीटरचा आहे, तर बहुतांश एक्सप्रेसवे गुजरातमध्ये 423 किलोमीटर लांबीचा असेल. या एक्स्प्रेस वेमुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर १८० किलोमीटरने कमी होईल आणि पूर्वीच्या २४ तासांऐवजी १२ तास लागतील.
बंगलोर-चेन्नई द्रुतगती मार्ग
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होण्यापूर्वी, भारतातील आणखी दोन प्रमुख शहरे नवीन द्रुतगती मार्गाने जोडली जातील. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार २६२ किमी लांबीचा बेंगळुरू-चेन्नई एक्स्प्रेस वे पुढील वर्षी कधीही खुला होउ शकतो.
हा एक्सप्रेसवे राष्ट्रीय द्रुतगती मार्ग 7 किंवा एनई–7 म्हणून देखील ओळखला जाईल. हे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारे 17,000 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. या मार्गामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांहून कमी होईल. विशेष म्हणजे, तो विमान प्रवासापेक्षा जलद प्रवास होईल. हलक्या वाहनांसाठी या एक्स्प्रेस वेची वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर असेल.
द्वारका एक्सप्रेसवे
प्रदूषणामुळे झालेल्या विलंबानंतर देशातील पहिला उन्नत शहरी महामार्ग पुढील वर्षी उन्हाळा सुरू होण्यापूर्वी खुला होणार आहे. एक्स्प्रेस वे जवळजवळ तयार असून काम अंतिम टप्प्यात आहे. 29 किमी लांबीचा द्वारका एक्सप्रेसवे ज्याला नॉर्दर्न पेरिफेरल रोड असेही म्हणतात. दिल्लीतील द्वारका ते हरियाणातील गुरुग्रामला जो जोडणार आहे. हा एक्सप्रेसवे एनएच-8 किंवा दिल्ली-गुरुग्राम एक्सप्रेसवेवरील शिव-मूर्तीपासून सुरू होतो, द्वारका सेक्टर 21, गुरुग्राम सीमा आणि बसईमधून जातो आणि खेरकी दौला टोल प्लाझाजवळ संपतो. एक्स्प्रेस वेचा सुमारे 19 किमी हरियाणामध्ये आहे आणि उर्वरित 10 किमी दिल्लीमध्ये आहे.
या एक्स्प्रेस वेमुळे प्रवाशांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. आणि एनएच-8 वरील वाहतूक सुमारे 50 टक्के कमी करेल.
दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे
या नवीन एक्स्प्रेस वेच्या निर्मितीनंतर दिल्ली ते अमृतसर प्रवासाचा वेळ केवळ चार तासांवर येणार आहे. सुमारे 669 किमी लांबीचा दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे पुढील वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होईल. हा एक्सप्रेसवे दिल्ली ते कटरा हा प्रवास सहा तासांत पूर्ण करेल. हा एक्सप्रेसवे अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, तरनतारनमधील गुरुद्वारा दरबार साहिब आणि कटरा येथील वैष्णो देवी यासारख्या अनेक धार्मिक स्थळांना जोडणार आहे.
दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे
या द्रुतगती मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम आता सुरू झाले आहे. दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे दिल्ली ते डेहराडून प्रवासाचा वेळ तीन तासांपेक्षा कमी होईल. दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेचा शेवटचा 20 किमीचा भाग राजाजी नॅशनल पार्कच्या इको-सेन्सिटिव्ह भागातून जातो. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आशियातील सर्वात लांब उंच वन्यजीव कॉरिडॉर बनवत आहे. ज्यामध्ये आरक्षित वनक्षेत्राला बायपास करण्यासाठी ३४० मीटरचा दात काली बोगदा समाविष्ट आहे.





