राज ठाकरे यांचा ताफा अडविला कुणी? मराठा आंदोलक की उबाठाचे कार्यकर्ते, पाहा….

बीड – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते बीड शहरात पोहचणार होते. मनसैनिक राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी थांबले होते. मात्र, शहरात दाखल होताना मोठ्या जमावाने राज ठाकरे यांचा ताफा अडविला आणि राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.
यातील काही लोकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देखील दिल्या. त्यामुळे मराठा आंदोलक असावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना (उबाठा) पक्षाचा मशाल हे चिन्ह असलेले झेंडे दिसत होते. त्यामुळे राज ठाकरे यांचा ताफा नक्की कुणी अडविला यावर शहरात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळाले.
राज ठाकरे बीडमध्ये पोहचल्यावर ज्या ठिकाणी त्यांचे स्वागत होणार होते, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मनसैनिक जमले होते. मात्र त्या ठिकाणी देखील जमावाने सुपाऱ्या फेकताना ‘सुपारीबाज- सुपारीबाज’ अशा घोषणा दिल्या.
घोषनांनंतर मात्र दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसैनिक आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले विरोधक एकमेकांना भिडले. मात्र पोलिसांनी मोक्याच्या क्षणी हस्तक्षेप करताना दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना शांत करून गर्दी कमी करण्यास सुरुवात केली.
मराठवाड्यात कुणाची सुपारी घेतली ?
राज ठाकरे यांनी नेहमीच धरसोडपणा करतात. त्यांनी लोकसभेत सुपारी घेऊन त्यांना (भाजापाला) पाठिंबा दिला होता. मग आता विधानसभेसाठी कुणाची सुपारी घेऊन ते मराठवाड्यात आले आहेत, याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे बीड जिल्हा शिवसेने (उबाठा)चे गणेश वरेकर यांनी बोलताना सांगितले.





