रतन टाटांच्या निधनानंतर 3800 कोटींच्या संपत्तीचे उत्तराधिकारी कोण? ‘या’ नावांची होतेयं चर्चा

Ratan Tata Passed Away | जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा आजारी असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झाले.
टाटा समूहाचं जगभरात मोठं नाव आहे. टाटा समूहाची संपत्ती देखील खूप आहे. रतन टाटा यांनी लग्न केले नाही. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर 3800 कोटी रुपयांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी कोण असणार? अशी चर्चा होत आहे.
नोएल टाटा होणार दावेदार ?
रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा यांचं नाव पुढे येत आहे. नोएल टाटा हे नवल टाटा आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. ते रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. नोएल टाटा यांना तीन मुलं आहेत. त्या तीनही मुलांना टाटा समूहाचे आगामी उत्तराधिकारी म्हणून पाहिलं जातं. यामध्ये माया टाटा, नेविल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे.
- लिया टाटा – स्पेनच्या ई बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या ३९ वर्षीय लिया टाटा या नोएल टाटांच्या सर्वात मोठ्या कन्या आहेत. टाटा समुहाच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये त्या तज्ज्ञ आहेत. ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस या टाटांच्या मालकीच्या उद्योगात त्यांचे मोठे योगदान आहे.
- माया टाटा – ३४ वर्षीय माया टाटा यांनी बेयज बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक इथून शिक्षण घेतले आहे. टाटा समुहात त्या टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये काम करत आहेत. टाटा न्यू अॅप लॉन्च करण्यात त्यांचं महत्वाचं योगदान होतं.
- नेविल टाटा – टाटा समुहाचा ग्रोसरी ब्रँड असलेल्या स्टार बझारच्या प्रमुखपदाची जबाबदारी ३२ वर्षीय नेविल टाटा यांच्यावर आहे. त्यांचं लग्न किर्लोस्कर कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत झालं आहे.
दरम्यान, अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये काम करत असताना प्रेमात पडल्याचे रतन टाटा यांनी सांगितले होते. पण त्यांच्या आजीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना भारतात परतावे लागले. त्यानंतर 1962 मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा मुलीचे पालक लग्नाच्या निर्णयावर सहमत नसल्याने त्यांचे नाते तुटले.





