Pune Police : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ आता पुण्यात ! कोण आहेत नवे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे?

Pune Police : पुणे शहर पोलिस दलात राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या या धडाडीच्या अधिकाऱ्याची मे 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त म्हणून बदली झाली होती.
अवघ्या एका महिन्यात पुन्हा त्यांची बदली करत महाराष्ट्र गृह विभागाने त्यांना पुणे शहरात महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. शुक्रवारी (27 जून 2025) गृह विभागाने 51 आयपीएस आणि 81 राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले, यामध्ये मुंडे यांच्यासह राजलक्ष्मी शिवणकर आणि ऋषीकेश रावले यांचीही पुणे शहरात पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे
शिक्षण ते शौर्यापर्यंतचा प्रवास
मूळचे देगलूरचे असलेले सोमय मुंडे यांनी साताऱ्याच्या सैनिकी शाळेत सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर डेहराडून येथून दहावी आणि हैदराबाद येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पवई येथील आयआयटीमधून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवणारे मुंडे यांचे पालक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. 2016 मध्ये आयपीएस अधिकारी बनल्यानंतर त्यांनी वैजापूर येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून करिअरला सुरुवात केली.
अमरावती येथे अपर पोलिस अधीक्षक आणि गडचिरोली येथे नक्षलविरोधी मोहिमांचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर लातूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ
सोमय मुंडे यांनी गडचिरोलीतील मरदीन टोला परिसरात 2021 मध्ये नक्षलविरोधी मोहिमेचे नेतृत्व करताना 26 नक्षलवाद्यांना ठार केले होते. यामध्ये 1 कोटी रुपये बक्षिसाच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, 50 लाख रुपये बक्षीस असलेला नक्षलवादी म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेचाही त्यांनी खात्मा केला. छत्तीसगडमधील अबुजमाळ आणि गडचिरोलीतील अटापल्ली येथील नक्षलविरोधी कारवायांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. या अतुलनीय शौर्यासाठी 2022 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले.
पुण्यातील नवीन आव्हान
मे 2025 मध्ये लातूरचे पोलिस अधीक्षक असताना मुंडे यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती. आता अवघ्या एका महिन्यात त्यांना पुणे शहरात पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 51 आयपीएस अधिकाऱ्यांसह 132 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुण्यात तीन नवीन उपायुक्तांची नियुक्ती झाली असून, मुंडे यांच्यासह राजलक्ष्मी शिवणकर आणि ऋषीकेश रावले यांचा समावेश आहे.
पुण्यासाठी शौर्य आणि अनुभवाची जोड
नक्षलविरोधी मोहिमांमधील दमदार कामगिरी आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर सोमय मुंडे पुणे शहर पोलिस दलात नवीन ऊर्जा घेऊन येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्तीमुळे पुणे शहर पोलिस दलाला एक शौर्यचक्रवीर अधिकारी लाभला असून, त्यांच्या अनुभवाचा फायदा शहराच्या सुरक्षेसाठी निश्चितच होणार आहे.





