बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांनी कबुलीजबाबात सुग्रीव कराडचं नाव घेतलं, ज्यामुळे या खटल्याला वेगळी दिशा मिळाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत बीड न्यायालयात पहिली सुनावणी झाली. आठ आरोपींपैकी कृष्णा आंधळे फरार आहे, तर इतरांची चौकशी सुरू आहे. चाटे आणि केदार यांनी दावा केला की, सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठीच हत्या घडल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे सुग्रीव कराड कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुग्रीव कराडची पार्श्वभूमी – सुग्रीव कराड हा बीडच्या केज तालुक्यातील तांबवा गावचा रहिवासी असून, तो राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. सुरुवातीला धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेला सुग्रीव लोकसभा निवडणुकीत संशयास्पद भूमिकेनंतर बाजूला झाला. त्यानंतर त्याने बजरंग सोनवणेंसोबत काम सुरू केलं. 2022 च्या केज नगरपंचायत निवडणुकीत त्याने सोनवणेंच्या मुलीचा (डॉ. हर्षदा) पराभव घडवला. बजरंग सोनवणेंनी यासाठी सुग्रीवला विष्णू चाटेंची साथ असल्याचा आरोप केला होता. पण नंतर सोनवणेंनीच सुग्रीवला जवळ घेत विष्णू चाटेविरुद्ध वापरलं. सुग्रीवच्या आई पंचायत समिती सदस्य होत्या, तर पत्नी नगरसेविका आहे. त्याच्यावर मारहाण, खून, दरोडा, दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुले-सुग्रीव कराड वाद – केजमध्ये संत भगवान बाबा जयंती उत्सवाच्या बैठकीत सुग्रीव कराड आणि विष्णू चाटे यांच्यात नेतृत्वावरून वाद झाला. सुदर्शन घुलेने विष्णू चाटेची बाजू घेत सुग्रीववर धावून गेला. यामुळे सुग्रीव अस्वस्थ झाला. केजमध्ये ‘डॉन’ म्हणून ओळखला जाणारा सुग्रीव आणि सुदर्शन घुले यांच्यात तेव्हापासून वर्चस्वाची लढाई सुरू झाली. विष्णू चाटेला सुदर्शनसारखा पाठीराखा मिळाल्याने सुग्रीवचा राग वाढला. हत्येचं मूळ कारण – आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना मारहाण केली. या मागे सुग्रीव कराड असल्याचा संशय सुदर्शन गटाला होता. संतोष देशमुख यांनी मारहाणीचा फोटो ‘बाप तो बाप रहेगा’ असं कॅप्शन देऊन व्हॉट्सअॅपवर टाकला, ज्याचा राग सुदर्शन गटाला होता. त्यांनी संतोष यांचं अपहरण करून मारहाण केली आणि ‘आम्हीच बाप आहोत’ असं म्हणत हत्या केली. मारहाणीदरम्यान संतोष यांच्या तोंडून सुग्रीवचं नाव आल्याने सुदर्शन गटाचा संशय खरा ठरला. दरम्यान, पोलिस फरार कृष्णा आंधळेचा शोध घेत असून, सुग्रीव कराडच्या भूमिकेचा तपासही सुरू आहे. हे प्रकरण आता वैयक्तिक वैर आणि राजकीय सूडाच्या दिशेने वळत असल्याचे दिसतेय.