Prashant Veer : कोण आहे प्रशांत वीर? ज्याला सीएसकेने विक्रमी बोली लावत बनवलं रातोरात करोडपती!

Who Prashant Veer most expensive uncapped Indian : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचे नशीब एका रात्रीत पालटलेले पाहायला मिळाले. त्यापैकी सर्वात चर्चेत असलेले नाव आहे प्रशांत वीर. उत्तर प्रदेशच्या प्रशांत वीर या २० वर्षीय युवा खेळाडूला लिलावापूर्वी इतकी मोठी बोली लागेल याचा कदाचित कोणालाच अंदाज नसेल. मिनी ऑक्शन २०२६ मध्ये प्रशांत वीर आयपीएल इतिहासातील संयुक्त सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. सीएसकेने त्याच्यावर मोठा डाव लावला. तो नक्की कोण आहे? जाणून घेऊया.
बोलीची चुरस आणि मोठी लॉटरी –
प्रशांत वीरवर बोलीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्सनेच केली. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स संघ या शर्यतीत उतरला. दोन्ही संघांमध्ये जोरदार चुरस सुरू असतानाच राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनीही बोली लावायला सुरुवात केली. विशेषतः हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात प्रशांतला विकत घेण्यासाठी जोरदार स्पर्धा रंगली. ज्यामुळे बोली लवकरच १० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेली.
Entering the world of yellove and how?🥳🔥
Prashant Veer, the most expensive uncapped player in the IPL!📈📈#WhistlePodu #IPLAuction pic.twitter.com/OwJY0FhoZK— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 16, 2025
मात्र, चेन्नई सुपर किंग्सने प्रशांत वीरचा नाद सोडला नाही आणि अखेरीस १४ कोटी २० लाख रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात घेतले. या किमतीमुळे प्रशांत आयपीएल इतिहासातील कार्तिक शर्मासह सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, तो भविष्यात स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा संभाव्य पर्याय म्हणून पाहिला जात आहे.
हेही वाचा – Auqib Nabi : सलग चार चेंडूंत ४ विकेट्स घेणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजावर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस
कोण आहे प्रशांत वीर?
प्रशांत वीर उत्तर प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि त्याचा टी-२० रेकॉर्ड प्रभावी आहे. त्याने खेळलेल्या ९ टी-२० सामन्यांमध्ये त्याने १२ विकेट्स घेतले आहेत. यासह फलंदाजी करताना त्याने १६७ च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने ११२ धावा केल्या आहेत. प्रशांत त्याच्या पॉवर हिटिंग आणि कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता यासाठी प्रसिद्ध आहे. तो अखेरच्या षटकांमध्ये अत्यंत प्रभावी ठरू शकतो.
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये प्रशांतने १६९ च्या स्ट्राइक रेटने ११२ धावा केल्या आहेत, तर ९ विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच, तो उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये ‘एमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्याच्या याच अष्टपैलू क्षमतेमुळे सीएसकेने त्याच्यावर इतका मोठा डाव खेळला आहे.





