मुक्काम पोस्ट जामखेड ! स्वतःला पुण्याचा ‘BOSS’ समजणारा नीलेश घायवळ कोण? वाचा संपूर्ण कुंडली

Nilesh Ghaiwal : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुक्रवारी भूम तालुक्यातील आंदरूड गावात मारहाण झाल्याची घटना घडली. आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. शुक्रवारी रात्री कुस्ती सुरु असताना निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घ्यायला गेला. त्यावेळी अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून जात मारहाण केली.
सागर मोहोळकर असं मारहाण करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. सागर पेशाने पैलवान आहे. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. दरम्यान, या घटनेनंतर सागर घटनास्थळावरुन पळून गेला.
आतापर्यंत नीलेश घायवळचे नाव घेतले की गुन्हेगारी विश्वातील लोकांचा थरकाप उडायचा. परंतु त्यालाच मारहाण झाल्याने नीलेश घायवळच्या गुन्हेगारी इतिहासाची नव्याने चर्चा रंगू लागली आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ नेमका कोण आहे? जामखेडच्या निलेश घायवळची पुण्यात दहशत का? त्याचा गुन्हेगारी इतिहास काय? आपण जाणून घेऊया सविस्तर…
कोण आहे निलेश घायवळ?
“बॉस Boss” या नावाचा दबदबा पुणे शहरातल्या गल्लो गल्लीत आहे. साल २००० ते २००३ आपलं नाव गुन्हेगारीतल्या वर्चस्वामध्ये गाजवलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ हा मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवाशी आहे. काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये शिक्षणासाठी आला होता. त्यावेळी निलेश घायवळ हा गजानन मारणे टोळीत होता. गजा मारणेसोबत त्याने एक खून केला होता. यामध्ये त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती.
मारणे आणि घायवळचं टोळीयुद्ध अक्ख्या पुण्यानं पाहिलं
बाहेर आल्यावर घायवळ याने आपली वेगळी टोळी केली. त्यानंतर मारणे आणि घायवळचं टोळीयुद्ध पुण्याने पाहिलं. या टोळीत झालेल्या वादात घायवळ टोळीतील पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केला. त्यानंतर गजानन मारणे आणि घायवळ टोळीयुद्धांमध्ये २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात नीलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडले याचा खून केला होता़. त्यानंतर दोन्ही टोळीमधील गुंड आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठले होते. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजक थराराचा पुण्याचा इतिहास आहे.
निलेश घायवळवर अनेक गुन्हे दाखल
कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण दहा पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
दोन्ही टोळीच्या संघर्षातून अनेकांचा जीव गेला
गेल्या काही वर्षात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात आहे. मारणे आणि घायवळ टोळीत अनेक सराईत गुन्हेगार काम करतात. मुळशी तालुक्यातील जमिनींचा आलेल्या सोन्याचे भावामुळे जमीन व्यवहारात दोन्ही टोळींच्या शिरकाव्याने उद्भवलेल्या संघर्षातून अनेकांचा जीव गेल्याचा इतिहास आहे
नीलेश घायवळच्या गुन्हेगारी इतिहासाची नव्याने चर्चा
अनेक गुन्ह्यांत नीलेश घायवळ जेलमध्ये जाऊन आला. २०२० मध्ये नीलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. त्यामुळे निलेश घायवळ शहरातून बाहेर गेला होता. दरम्यान, हद्दपारीची कारवाई संपल्यानंतर नीलेश घायवळने अनेक राजकारण्यांच्या भेटी घेतल्याचेही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले.
तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या वर्षी घायवळने भेट घेतल्यानंतर चर्चाना उधाण आलं होतं. तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही घायवळचे अनेक राजकारण्यांबरोबर संबंध आहेत. आता मारहाण झाल्याने नीलेश घायवळच्या गुन्हेगारी इतिहासाची नव्याने चर्चा होऊ लागली आहे.





