अजित पवारांची होणारी सून ऋतुजा पाटील कोण? सहकार महर्षींची नात, किराणा मॉलची संचालिका!

पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात थाटात पार पडला. हा सोहळा पुण्यातील घोटावडे येथील अजित पवारांच्या फार्म हाऊसवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. साखरपुड्याला शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, प्रतापराव पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. पारंपारिक पद्धतीने, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य सजावटीत हा कार्यक्रम साजरा झाला.
ऋतुजा पाटील कोण?
ऋतुजा पाटील या फलटण येथील सहकार महर्षी हणमंतराव पवार यांची नात आणि पल्लवी प्रवीण पाटील यांची मुलगी आहेत. तिचे वडील प्रवीण पाटील हे पुण्यातील नामांकित व्यावसायिक असून, ते ‘आयडिया’ या टेलिकॉम कंपनीचे माजी सीईओ आहेत. सध्या त्यांनी ‘जायंट सायकल’ हा सायकल उत्पादनाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला असून, ते बहुराष्ट्रीय कंपन्यांना सल्लागार म्हणून काम करतात. ऋतुजा स्वतः फलटण येथील ‘श्रीराम बाजार’ या किराणा मॉलची संचालिका आहे.
साखरपुड्याचा थाट –
या खास सोहळ्यासाठी फक्त निवडक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. जय आणि ऋतुजा यांच्या या नव्या प्रवासाला पवार कुटुंबाचा आशीर्वाद मिळाला असून, हा साखरपुडा पवार कुटुंबातील एक महत्त्वाचा प्रसंग ठरला आहे. आता सर्वांचे लक्ष या जोडप्याच्या लग्नाकडे लागले आहे.





