Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान कोणाला? अजित पवार की एकनाथ शिंदेंना? जाणून घ्या …

सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीसमोर एका गंभीर प्रश्नाने अडकून पडली आहे. कार्तिकी एकादशीला (१ नोव्हेंबर ) विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला द्यायचा? हा प्रश्न मंदिर समितीला धर्मसंकटात टाकत आहे.
परंपरेनुसार, आषाढी एकादशीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हा मान मिळतो, जसे की यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूजा केली. तर कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना हा सन्मान दिला जातो. पण सध्या राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने नेमकं कोणाला आमंत्रित करावे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मंदिर समितीची आज (५ ऑक्टोबर) पार पडलेली महत्त्वाची बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष गहिणीनाथ औसेकर यांनी सांगितले की, “परंपरा आणि वर्तमान राजकीय स्थिती यांच्यातील ताळमेळ साधण्यासाठी आम्ही राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत. कार्तिकी एकादशीला राज्याच्या वतीने पूजा करण्याचा मान कोणाला मिळेल, याबाबत शासनाची दिशानिर्देश मिळाल्यानंतरच निर्णय घेतला जाईल.” ही पूजा १ नोव्हेंबरला होणार असल्याने वेळेचा अभाव असल्याने समितीने तातडीने कारवाई सुरू केली आहे.
याआधीही उद्भवलेल्या पेचप्रसंग
२०२३ मध्ये तत्कालीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. कार्तिकी एकादशीला पूजेचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता. परंतु, मराठा आरक्षण आंदोलकांच्या धमकीमुळे प्रक्रिया गुंतागुंतीची झाली होती आणि समितीने शासनाकडून स्पष्टीकरण मागितले होते. २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागलेली असल्याने दोघांपैकी एकाही उपमुख्यमंत्र्यांना पूजेचा मान देण्यात आला नव्हता. त्याऐवजी विभागीय आयुक्तांच्या हस्ते पूजा पार पडली होती.
यावर्षीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (पंचायत समिती, जिल्हा परिषद) निवडणुका होण्याची शक्यता असल्याने आचारसंहितेचा मुद्दा पुन्हा उपस्थित होऊ शकतो. निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली तरी कोणत्या उपमुख्यमंत्र्याला प्राधान्य द्यायचे, हा प्रश्न कायम आहे. मंदिर समितीने याबाबत गृह विभाग आणि विधी विभागाशी संपर्क साधला असून, शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.





