आळंदीला जाणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीकडून सुविधा पुणे – कार्तिकी एकादशी आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र आळंदी यात्रेसाठी दि. १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ३६२ नियमित बससह जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेल्या भाविकांना पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रात या गाड्या सोडण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी श्री क्षेत्र आळंदी येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे बुधवार (दि. १२) पासून आळंदीमध्ये येणाऱ्या भाविकांची गर्दी सुरू होईल. त्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलकडून आळंदी मार्गावर धावणाऱ्या नियमित १३३ बसबरोबरच २२९ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, दि. १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान तीन दिवसांसाठी रात्रीच्या वेळीही बससेवा गरजेनुसार देण्यात येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे. आळंदी बसस्थानकावरून संचलनात असलेले बसमार्ग क्रमांक २६४ भोसरी ते पाबळ, बसमार्ग क्रमांक २५७ आळंदी ते मरकळ व बस मार्ग क्रमांक ३६४ आळंदी ते चाकण आंबेठाण चौक व रनिंगमध्ये ये-जा करणारा हे ३ बसमार्ग यात्रेच्या काळात संपूर्णतः बंद राहतील. तसेच, मार्गावरील शेड्युलची शेवटची खेप झाल्यानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकास यात्रा कालावधीत रात्री १० नंतर जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, म.न.पा. भवन, निगडी, पिंपरी-चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी येथून या नियमित बससह जादा बस सोडण्यात येणार आहे. जादा बससेवेसाठी रात्री १० नंतर (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकीट दरापेक्षा रुपये १० जादा तिकीट दर आकारणी करण्यात येईल.