पांडुरंग विठ्ठला…!! एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा संपन्न; नांदेडचे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Kartiki Ekadashi 2025 | कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विधीवत संपन्न झाली. पहाटे २ वाजून २० मिनिटांनी ही महापूजा सुरू झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यासह शासकीय महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते.
यंदा कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील रामराव बसाजी वालेगावकर आणि त्यांच्या पत्नी सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना मिळाला. वालेगावकर दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून वारी करत आहे. या दाम्पत्याला शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाल्यानंतर त्यांना आनंदाश्रू अनावर झाले होते. पांडुरंगाच्या कृपेमुळे आम्हाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच मानसी आनंद माळी व आर्य समाधान थोरात या दोन शालेय विद्यार्थ्यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आले होते. राज्यावर आलेलं नैसर्गिक संकट लवकर दूर होऊ दे, माझा बळीराजा सुखी समाधानी राहू दे, असे साकडे आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
‘आषाढी वारीची शासकीय महापूजा करायला आवडेल’
महापूजेनंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच पूजेचा मान चौथ्यांदा मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली, हे आमचे भाग्य आहे. पुढील वर्षी आषाढी वारीची शासकीय महापूजा करायला आपणास निश्चित आवडेल,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. Kartiki Ekadashi 2025 |
◻️LIVE📍श्री क्षेत्र पंढरपूर
🗓️ 02-11-2025
विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो
🚩 🙏🏻 कार्तिकी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा – लाईव्ह https://t.co/yu7tpRetu4— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 1, 2025
पांडुरंगाकडे साकडं
“पंढरपूरमध्ये आल्यानंतर वेगळे समाधान मिळते. महापूजा करण्याचे भाग्य मिळाले. बळीराजा संकटात आहे. त्याच्यावरील अरिष्ट दूर कर, मंत्री मंडळाने 32 हजार कोटींचे मदत दिली. कर्जमाफी उपाय बाबत सरकारने निर्णय घेतला. त्याची शिफारस एप्रिलमध्ये येईल. पांडुरंगाकडे साकडे घातले शेतकरी, वारकरी, लाडक्या बहिणी सगळ्याचे जीवनात सुख समाधान आनंदाचे दिवस येऊ दे. सगळे अरिष्ट दूर होऊ दे. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक होऊ दे,” असेही यावेळी शिंदे म्हणाले.
“या ठिकाणी व्हीआयपी लोक आम्ही नाही. याठिकाणी वारकरी व्हीआयपी आहेत. मी देखील शेतकरी व वारकरी कुटुंबातून आलो आहे. एक सामान्य कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे ही पांडुरंगाचीच कृपा आहे. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, ही वारकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिले. Kartiki Ekadashi 2025 |
दरम्यान, कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जवळपास सात लाख भाविक दाखल झाले आहेत. Kartiki Ekadashi 2025 |
हेही वाचा:





