पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आपल्या देशाच्या प्रगतीसाठी काम करताना पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करण्याचा संकल्प करा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यस्तरीय स्काऊट गाईड पुरस्कार प्रमाणपत्र राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅव्हेलीयन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड्सचे अध्यक्ष सुनील केदार, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, स्काऊट गाईडमध्ये काम करताना प्रमाणपत्र अथवा पुरस्काराची आशा न बाळगता समाजसेवा करावी. समाजसेवा केल्यानंतरचे जे आशीर्वाद मिळतात ते पुरस्कारापेक्षा खूप महत्त्वाचे असतात. या पुरस्काराने सर्वांना प्रोत्साहन मिळेल. आज तुम्ही राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला, यापेक्षा अधिक चांगले काम केल्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकाराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, मुंबई येथे राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील १४५ स्काऊट्स व गाईड्स यांना सन २०१८-२०१९ व २०१९- २०२० या वर्षांतील राज्यस्तरीय स्काऊट – गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. pic.twitter.com/SzN3DbT4I9
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 26, 2022
प्रार्थना न करता प्रार्थनेमधील अर्थांची स्वतःच्या जीवनात अंमलबजावणी करा. काम करताना ते मनापासून उत्तम करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्य हे स्काऊट गाईडच्या माध्यमातून समाजसेवक घडविण्यात देशात प्रथम स्थानी आहे. सामजिक जाण, सहकार्य, शांती, अहिंसा व सत्य हे गुण अखंडपणे जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी स्काऊट गाईडने आजवर योगदान दिले आहे. राज्यात अतिदुर्गम भाग असलेल्या ठिकाणी या चळवळीतून मुलांवर खूप चांगले संस्कार घडविले जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने आपल्या शालेय जीवनातील स्काऊट गाईडच्या आठवणींना उजाळा देत राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.





