पुणे जिल्हा : घोटवडे-रिहते स्वखर्चातून होतेय समाजसेवा

खांबोली-खेंगरेवाडीत मंदिराला पत्राशेडची मदत, बाबाजी शेळके यांचा उपक्रम
पौड : शासन सर्वच ठिकाणी पुरून उरत नाही. कुठे न कुठे काहीतरी कमीच पडते. त्यामुळे राहिलेली उणीवा सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकसहभाग यांनी भरल्या जातात. मुळशीत असेच सामाजिक काम वारकरी आणि राजकीय क्षेत्रातील बाबाजी शेळके यांच्याकडून अव्याहतपणे चालू आहे. नुकतीच याची प्रचिती खांबोली-खेंगरेवाडी ग्रामस्थांना आली. येथील हनुमान मंदिराला स्वखर्चातून पत्राशेडचे सभागृह व लोकसहभाग यातून त्याची पूर्तता बाबाजी शेळके यांच्या माध्यमातून झाली आहे.
खांबोली-खेंगरेवाडी येथील हनुमान मंदिराच्या स्लॅबला पाण्याची गळती लागली होती. पावसाळ्यात मंदिराच्या हॉलमध्ये पूर्णपणे पाणी साचत होते. गावकरी व वाडीतील मंडंळाच्या कार्यकर्त्यांनी बाबाजी शेळके यांना ही गोष्ट सांगितली. शेळके यांनी लागलीच दोन लाख रुपये देऊन हनुमान मंदिराच्या स्लॅबवर 50 बाय 40चे पत्राशेड व सभागृहासाठी मदत केली. गावातीलच वेल्डर व फॅब्रिकेशनची कामं करणार्यांनी त्यात वाटा उचलून काम पूर्ण केले. त्यामुळे स्लॅबवर साचणारे पाणी आता साचणार नसल्याने मंदिरात होणारी पाणी गळती थांबली आहे. ग्रामस्थांच्या याबाबत समाधान व शेळके यांचे आभार व्यक्त केले.
पिंपळोली-गवारेवाडी येथील गणेश मंदिरास फरशी व दरवाजा-खिडकीचे काम बरेच दिवस बाकी होते. या कामासाठी बाबाजी शेळके यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने ते काम करून दिले आहे. भेगडेवाडी-घोटवडे येथे स्वखर्चातून बस थांबा देखील बाबाजी शेळके यांनी उभारला आहे. ऊन-वारा-पाऊस यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष यांना बसची वाट पाहत उभे रहावे लागायचे. ही गोष्ट पाहून शेळके यांनी स्थानिक सरपंच, उपसरपंच व घोटवडे ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने स्वखर्चातून बस थांबा उभारल्याने आता नागरिकांची सोय होणार आहे.
शेळके यांचे सामाजिक काम अविरत चालू आहे. स्वखर्चातून त्यांनी रस्ते, खड्डे बुजवणे, रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण, लोकांना मोफत धार्मिक यात्रा, आरोग्य शिबीरे व उपचार, दिवाळी फराळ, मकरसंक्रांत-नववर्ष भेट असे अनेक उपक्रम राबवले आहेत व राबवत देखील आहेत. तसेच शासकीय योजनेतून निधी मिळवूनही विकासकामं राबवली आहेत.
समाजात जगत असताना समाजाचं काही देणं लागतो, या भावनेतून समाजसेवा चालू असून नागरिकांच्या सुखसोयी व सुविधांसाठी अविरत प्रयत्न करत राहू.
-बाबाजी शेळके, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), मुळशी तालुका





