आईच्या स्मृतीतून समाजसेवेचा दीप; काळे परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

माळेगाव: मातृप्रेमाचे ऋण फेडण्यासाठी आणि आईच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी उद्योजक रवींद्र उर्फ आबा काळे-देशमुख परिवाराने एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. त्यांच्या मातोश्री दिवंगत चंद्रभागा शंकरराव काळे-देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवार, दि. १५ जानेवारी रोजी शारदानगर, बारामती येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून ती समाजसेवेसाठी अर्पण करण्यात आली.
‘रुग्णवाहिका ठरेल आईच्या मायेचा आधार’
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांचे प्राण वाचावेत, या उदात्त उद्देशाने काळे परिवाराने ही रुग्णवाहिका समर्पित केली आहे. ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नसून, आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांसाठी ‘आईच्या मायेचा आधार’ ठरेल. आईच्या आठवणींना अशा प्रकारे समाजसेवेची जोड देणे ही बाब कौतुकास्पद आहे.”
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला युवक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच रक्तदात्यांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात तब्बल २५० रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. आईच्या निधनाचे दुःख कुरवाळत न बसता त्यांच्या आठवणींना समाजसेवेचे रूप देणे, हेच खऱ्या अर्थाने त्यांचे पूजन असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांतीलाल शंकरराव काळे, रवींद्र शंकरराव काळे, सचिन नंदकुमार काळे, सागर चंद्रकांत काळे, सूरज सुरेश काळे, सुमित चंद्रकांत काळे, श्रीनिवास सुरेश काळे, विराज दत्तात्रय काळे, प्रतीक कांतीलाल काळे, ज्ञानव्ही रवींद्र काळे, मधुरा रवींद्र काळे तसेच नवजीवन ग्रुपच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. काळे परिवाराने समाजासमोर ठेवलेला हा सेवाभावी आदर्श सध्या परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.




