कोणत्या देशात विवाहावर सर्वात जास्त खर्च केला जातो? भारतातील प्रत्येक लग्नामध्ये सरासरी….

Expenditure on wedding – विवाह आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांपैकी एक असते आणि त्यामुळेच लोक विवाहावर स्वतःच्या बचतीचा किंवा गुंतवणुकीच्या आणि प्रसंगी कर्ज काढून मोठा खर्च करतात असे दिसून येते. गेल्या काही वर्षात विवाहाची बाजारपेठ जगभरात वेगाने वाढताना दिसत आहे. मात्र त्याचे प्रमाण देशानुसार वेगवेगळे आहे. 2023 च्या ग्लोबल वेडिंग रिपोर्ट मध्ये विवाह समारंभांसंदर्भातील रंजक माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये विवाहात लागणाऱ्या सेवा, पाहुण्यांची संख्या, त्या देशांची संस्कृती आणि विवाह अशी माहिती आहे.
विवाहासाठी भरभक्कम खर्च करणाऱ्या देशांमध्ये अर्थातच अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. त्या देशात विवाहासाठी जोडपी मोठा खर्च करत असतात. अमेरिकेमध्ये प्रत्येक विवाहामागे सरासरी 30 हजार डॉलर एवढा खर्च केला जातो. विवाहाच्या खर्चावर प्रभाव टाकणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या. त्यामध्ये मात्र भारत आघाडीवर आहे.
भारतात लग्नासाठी साधारणपणे सरसकट सर्वांना बोलावले जाते. त्यामुळे भारतातील प्रत्येक लग्नामध्ये सरासरी 285 पाहुणे उपस्थित असतात असे या अहवालात म्हटले आहे. त्याखेरीज भारतात लग्नावरील खर्चातही खूप मोठा फरक दिसून येतो. साधारणपणे सुशिक्षित मध्यमवर्ग लग्नासाठी सरासरी 25 हजार अमेरिकी डॉलर खर्च करतो, असे या अहवालात म्हटले आहे. भारतात होणाऱ्या एकूण विवाह समारंभांपैकी 15 टक्के विवाह समारंभाचा खर्च हा 45 हजार अमेरिकी डॉलर पेक्षाही जास्त असतो. विवाह समारंभात पार्टी किंवा ड्रीम पार्टीसाठी खर्च करणाऱ्या देशांमध्ये युनायटेड किंगडम, इटली, स्पेन हे तिघेही एकत्रितपणे अव्वल स्थानी आहेत. या देशांमध्ये लग्नाआधीच्या पार्टीसाठी सरासरी 23 हजार अमेरिकी डॉलर खर्च केला जातो.
लग्नावरील खर्चाच्या यादीत पोर्तुगाल हा देश सातव्या क्रमांकावर येतो. त्या देशातील लग्नात सरासरी 17000 अमेरिकी डॉलर खर्च केले जातात आणि त्या देशात लग्नासाठी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांची सरासरी संख्या 112 एवढी असते. सर्व लग्न समारंभांमध्ये घेतली जाणारी सेवा म्हणजे फोटोग्राफर. लग्नातील 93% घटना किंवा विधींच्या वेळी फोटोग्राफर उपस्थित असतोच. विवाह निश्चित झाला की मेकअप अँड हेअर, जेवण, कपडे, सजावट अशा सेवांना मागणी वाढते.
लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये लग्नाचा परिणाम हा दांपत्याच्या अर्थकारणावर होतो असे दिसून आलेला आहे. कारण लग्नाचा सगळा खर्च फेडणे हे लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये एक आर्थिक आव्हान मानले जाते. त्यामुळे अनेक लग्नांमध्ये दांपत्ये येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात असतात.
लग्नासाठीच्या बारीक-सारीक गोष्टी आणि लग्नाचा खर्च लक्षात घेता त्यासंदर्भातील तरतूद करण्यासाठी पोर्तुगाल, स्पेन, इटली आणि ब्राझील या देशांमध्ये लग्न ठरवल्यापासून ते लग्न होण्यापर्यंत अकरा ते बारा महिन्यांचा कालावधी जातो. लग्न म्हणजे दोन जीवांचे आणि दोन कुटुंबांचे मिलन असते आणि अर्थातच प्रत्येक वेळी त्या ठिकाणी धार्मिक विधी होतोच असं नाही युनायटेड किंगडम मध्ये केवळ 22 टक्के विवाह समारंभांमध्ये धार्मिक विधी केला जातो. इटली, कोलंबिया, पोर्तुगाल, मेक्सिको, ब्राझील, पेरू अशा देशांमध्ये पन्नास टक्के लग्न समारंभांमध्ये धार्मिक विधी हा केला जातो.
लग्नाला जाताना पुष्पगुच्छ घेऊन जाणे हे लॅटिन अमेरिकन देशांमध्ये अगदी सर्रास चालते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. युरोपातील पोर्तुगाल सारख्या देशांमध्ये 77% विवाह समारंभाला पाहुणे पुष्पगुच्छ घेऊन जातात. त्या तुलनेत युनायटेड किंग्डम मध्ये साधारणपणे 12% विवाहसमारंभांनाच लोक पुष्पगुच्छ घेऊन जात असल्याचे दिसते.
लग्नासाठी दांपत्यांची भेट साधारणपणे कॉमन मित्र-मैत्रिणी मार्फत होते असे दिसून आलेले आहे इटलीमध्ये 27% दांपत्याची भेट मित्र-मैत्रिणींच्या मार्फतच झाल्याचे दिसून येते. स्पेन मध्ये हे प्रमाण 31 टक्के, पोर्तुगालमध्ये 27% फ्रान्समध्ये 27% आणि ब्राझीलमध्ये 24 टक्के एवढे आहे. ऑनलाइन क्यूपिड ही डेटिंग साईट आणि ॲप आहे. अमेरिकेत आणि कॅनडात जुळणाऱ्या लग्नांपैकी 32% विवाह या साईटमार्फत होतात.





