“जगभरात कुठंही जा, साडी ही भारतीय स्त्रीची ओळख” – अभिनेत्री माधुरी पवार

वालचंदनगर (पुणे) – लंडनमध्ये फिरताना वा शॉपिंगसाठी जातानाही माधुरीनं पारंपरिक आणि तिच्या आवडत्या पेहरावाला अर्थात साडीला पसंती दिली आहे. ‘जगभरात कुठंही जा, साडी ही भारतीय स्त्रीची ओळख आहे,’ असं माधुरी सांगते. सध्या ती ‘लंडन मिसळ’ या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण तिथं करत आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स ही संस्था या सिनेमाची प्रस्तुतकर्ता आहे.
या चित्रपटात भरत जाधव, ऋतुजा बागवे, निखिल चव्हाण, रितिका श्रोत्री, ऋतुराज शिंदे आणि गौरव मोरे यांच्याही भूमिका आहेत. माधुरीच्या भूमिकेचे तपशील जाहीर झालेले नसले, तरी यातही तिला भन्नाट भूमिका मिळाल्याचं कळतंय. ‘या भूमिकेविषयी आता फार काही जाहीर करता येणार नाही, मात्र मला ही भूमिका साकारताना खूपच मजा येत आहे. हे चित्रीकरण संपवून दिवाळीपूर्वी मी घरी परतणार आहे. मला दिवाळीचे वेध लागले आहेत,’ असं माधुरी सांगते.
‘रानबाजार’ या मराठी सीरीजमध्ये झळकलेली अभिनेत्री माधुरी पवार सध्या अनेक कलाकृतींमध्ये काम करतेय. सोशल मीडियावर तिचा भरपूर चाहतावर्ग आहे. तिचे अपडेट ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सध्या चर्चा आहे, ती तिच्या साडी लूकची आणि तो ही लंडनइथला. आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी माधुरी सध्या लंडन इथं आहे.





