अमेरिकेत भारतीय तरुणीची निर्घृण हत्या; आरोपी भारतात पळाल्याचा संशय, वडिलांची सरकारकडे मदतीसाठी साद

Indian Woman Killed In US: अमेरिकेतील मॅरीलँड राज्यामध्ये एका २७ वर्षीय भारतीय तरुणीची तिच्या राहत्या अपार्टमेंटमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. निकिता गोडिशाला असे मृत तरुणीचे नाव असून ती मूळची तेलंगणाची रहिवासी होती. या प्रकरणी तिचा माजी रूममेट अर्जुन शर्मा (२६) याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
निकिता गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास होती आणि तिथे नोकरी करत होती. निकिता ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होती, तिथे अर्जुन शर्मा हा तिचा रूममेट होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता २ जानेवारीपासून बेपत्ता होती. आश्चर्यकारक बाब म्हणजे, आरोपी अर्जुननेच स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या काही तासांतच अर्जुन अमेरिकेतून भारताकडे रवाना झाला. जेव्हा पोलिसांनी त्याच्या अपार्टमेंटची झडती घेतली, तेव्हा तिथे निकिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. तिच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या.
वडिलांचा दावा: ‘तो प्रियकर नव्हता, तर रूममेट होता’
काही माध्यमांमध्ये अर्जुन हा निकिताचा माजी प्रियकर असल्याचे म्हटले जात होते, मात्र निकिताचे वडील आनंद गोडिशाला यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी सांगितले की, “तो केवळ तिचा माजी रूममेट होता. त्याने निकिताकडून खूप पैसे उसने घेतले होते. निकिता जेव्हा भारतात येण्याची तयारी करत होती, तेव्हा तिने दिलेले पैसे परत मागितले. याच रागातून त्याने माझ्या मुलीची हत्या केली आणि तो पळून गेला.”
An Indian-origin woman, Nikitha Godishala (27), was found brutally murdered inside an apartment in Maryland, USA.
US police say she was last seen with her ex-boyfriend.
She suffered multiple stab wounds.A missing complaint was filed after she could not be contacted.
On the… pic.twitter.com/6D5zzsPlvA— MR.X (Krish Konnects) (@Krish_RC_) January 5, 2026
सरकारकडे मदतीची मागणी
निकिताच्या वडिलांनी अत्यंत भावूक होऊन भारत सरकार आणि तेलंगणा सरकारकडे विनंती केली आहे. “माझ्या मुलीचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी आम्हाला मदत करावी. तसेच त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
दूतावास आणि पोलिसांची कारवाई
वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेतली असून ते निकिताच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत. स्थानिक प्रशासनाकडून अधिक माहिती घेतली जात आहे. हॉवर्ड काउंटी पोलिसांनी अर्जुन शर्माविरुद्ध अटकेचे वॉरंट जारी केले आहे. तो भारतात पळून गेल्याची दाट शक्यता असल्याने अमेरिकन तपास यंत्रणा आता भारतीय यंत्रणांशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.





