Pimpri :लाडकी बहीण योजनेमुळे साडी बाजार तेजीत!

पिंपरी – दिवाळीच्या सणामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील साडी बाजारात महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतून मिळालेल्या निधीमुळे महिलांच्या खरेदीला अक्षरशः उधाण आले आहे. पारंपरिक ते आधुनिक फॅन्सी साड्यांची विक्री तब्बल २५ टक्क्यांनी वाढली आहे.
पिंपरी बाजारपेठ, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, पिंपळे सौदागर आणि भोसरी येथील साडी दुकाने महिला ग्राहकांनी फुलून गेली आहेत. “या वर्षी महिलांनी पारंपरिक पैठणी, येवला पैठणी, बांधणी, टिशू, ऑर्गेंझा, तसेच ट्रेंडिंग ‘रील्स साड्या’ व वेस्टर्न स्टाइल साड्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे,” असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ‘रील्स’मध्ये दिसणाऱ्या साड्यांची क्रेझ तरूणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएंसर व अभिनेत्रींच्या व्हिडिओंमधून प्रेरणा घेत अनेक दुकानदारांनी ‘रील्स स्पेशल कलेक्शन’ बाजारात आणले आहे. त्यामुळे विक्रीतही चांगली वाढ झाली आहे.
फॅन्सी ते पारंपरिक साड्यांना मागणी
या वर्षी सिल्क, चंद्रकोर पैठणी, नारायणपेठ, बांधणी अशा पारंपरिक साड्यांसह डिझायनर रेडिमेड ब्लाऊज साड्यांची मागणी वाढली आहे. दोनशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे दर असून सर्व स्तरातील ग्राहकांना आपल्या आवडीची साडी मिळते आहे. “लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या हातात पैसा आल्याने विक्रीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोजची गर्दी वाढत असून भाऊबीजेपर्यंत रेकॉर्डब्रेक विक्री होईल,” असे व्यापा-यांनी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे:
– साडी बाजारात २५% विक्री वाढ
– ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांचा खरेदीला हातभार
– फॅन्सी, वेस्टर्न व पारंपरिक साड्यांना मोठी मागणी
– सोशल मीडियामुळे ‘रील्स साड्यांचा’ नवा ट्रेंड
– दिवाळीपूर्वी विक्रेत्यांना विक्रमी व्यवसायाची अपेक्षा





