लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती…
Ladki Bahin Yojana । लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. मात्र अद्याप १५०० ऐवजी २१०० रुपये देण्यात आलेले नाही. आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे १५०० रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे. महिलांच्या नावावर काही पुरुषांनी पैसे घेतले असून काहींनी आपण पुरुष आहे हे ओळखले जाऊ नये म्हणून चक्क मोटरसायकलचा फोटो लावला आहे. अशांचे पैसे थांबवले आहेत. तरीही एखाद्या बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबवू नये असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. प्रत्येकाची पडताळणी करा आणि त्यात पात्र ठरणाऱ्यांंना पैसे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भ्रष्टाचार योजनेत नाही, त्यांच्या (विरोधकांच्या) डोक्यात
विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, आधी त्यांनी लाडकी बहीण योजना लागू होऊ नये म्हणून अडथळे आणले. आता ते भ्रष्टाचाराच्या आरोपांची ओरड करत आहेत. भ्रष्टाचार योजनेत नाही, तो त्यांच्या डोक्यात आहे. आमच्या सरकारला सत्तेवर आणणाऱ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी ताकदीने उभे राहण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही जण लाडकी बहीण योजनेविरुद्ध न्यायालयात गेले. तेथे काही जमले नाही म्हणून आता या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र या योजनेत कोणाताही भ्रष्टाचार झालेला नसून या योजनेतील पैसे कोणाचाही खात्यात जात नाहीत. केवळ सरकारी तिजोरीतीतून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जातात, असे फडणवीस म्हणाले.
२५ लाख लखपतीदीदी तयार
फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील बचत गटांद्वारे २५ लाख लखपतीदीदी तयार झाल्या आहेत. यंदा आणखी २५ लाख लखपतीदीदी होतील आणि पुढील काही वर्षांत ही संख्या एक कोटीच्या घरात जाईल. लखपतीदीदी योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. मुलींसाठी केजी ते पीजी शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, यासाठी पहिल्या टप्प्यात दहा मॉल उभारले जात आहेत.
दरम्यान, सरकारने लाडक्या बहीणींना अपात्र ठरवण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आतापर्यंत तब्बल 26 लाख लाडक्या बहीणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. तर आणखी 26 लाख लाडक्या बहीणींची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
Pune City | इतिहासात पहिल्यांदा औद्योगिक वीजदर कपात ; पुढील पाच वर्षांत १०% घट..





