प्रभात वृत्तसेवा पुणे – आतापर्यंत आपण दरवर्षी वीज दरवाढ करीत आलो आहोत. परंतु, इतिहासात पहिल्यांदाच आपण औद्योगिक वीजदर कपात केली आहे. दरवर्षी सरासरी १.९ टक्के प्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये १० टक्के दर कमी होतील. तसेच उद्योगांची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी केले. गणेशखिंड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात पुणे शहरातील उद्योजक संघटनांसोबत लोकेश चंद्र यांनी संवाद साधला. यावेळी महावितरणचे संचालक सचिन तालेवार, योगेश गडकरी, राजेंद्र पवार, परेश भागवत व दिनेश अग्रवाल, भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे यांचेसह शहरातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पुण्यातील उद्योजकांची वाढती वीज मागणी लक्षात घेता महावितरणने एमआयडीसीकडे नवीन वीज उपकेंद्रांसाठी जागेची मागणी केली आहे. एमआयडीसी याबाबत सकारात्मक असून, सर्व्हे करून नवीन जागेचा शोध घेतला जाणार आहे. नवीन जागांसाठी महावितरण आग्रही आहे. तसेच, नव्याने विस्तारित होणाऱ्या औद्योगिक वसाहतींचा बहृत आराखडा तयार करतानाच वीज उपकेंद्रांसाठी जागेचे आरक्षण टाकण्यात यावे यासाठीही महावितरण पाठपुरावा करीत असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. दरम्यान, उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणने ‘स्वागत कक्षा’ची निर्मिती केलेली आहे. प्रत्येक मंडल कार्यालय स्तरावर हा कक्ष कार्यरत राहणार आहे. तसेच, वीजपुरवठा खंडित होण्यामागे अंतर्गत बिघाड हे देखील एक कारण आहे. त्यामुळे उद्योगांनीही ‘लोड ब्रेक स्विच’चा वापर करावा, असेही चंद्र यांनी म्हटले आहे.