Dehu-Alandi Road: देहू-आळंदी मार्गाच्या रुंदीकरणाचा मुहूर्त कधी?
Dehu-Alandi Road: शेतकऱ्यांना अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही.

देहूगाव – देहू नगरपंचायत हद्दीतील मुख्य प्रवेशद्वारापासून काळोखे चौकापर्यंतच्या देहू-आळंदी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या काही शेतकऱ्यांना अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे रस्त्याचे काम कधी सुरू होणार, रस्ता किती रुंद होणार आणि निधीची तरतूद झाली आहे का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम नीर्माण झाले आहे.
या प्रश्नासाठी जनजागृती सामाजिक मंचाचे अध्यक्ष प्रकाश काळोखे यांच्या वतीने संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आहे. वाहतूक कोंडी निराकरण आणि रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची झाडे हटविण्याची प्रक्रिया प्रस्तावित असल्याचे समजते. मात्र, प्रत्यक्ष कामासाठी निधीची उपलब्धता अद्याप स्पष्ट झालेली नाही.
भूसंपादन, बाधित शेतकऱ्यांना मोबदला, रस्त्याची निश्चित रुंदी ,नकाशा आणि निधीबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती जाहीर करावी. तसेच देहू-आळंदी मार्गाचे रुंदीकरण तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी ही यावेळी नागरिकांकडून होत आहे.
मुदत संपल्याचा बाधित शेतकऱ्यांचा दावा
देहू-आळंदी मार्गाच्या रुंदीकरणासाठी झालेल्या भूसंपादनाचा अवार्ड सुमारे १४ वर्षे जुना असून, त्याची मुदत १२ वर्षात संपल्याचा दावा बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे जुन्या अवार्डनुसार मोबदला देण्याऐवजी सध्याच्या परिस्थितीनुसार नव्याने अवार्ड काढून योग्य व वाढीव मोबदला अद्याप पर्यंत मोबदला न मिळालेल्या बाधित शेतकऱ्यांना द्यावा, याबाबत प्रशासनाने लवकरात लवकर स्पष्टता करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांकडून केली जात आहे.





