Phaltan Marathon: ‘आपली फलटण’ मॅरेथॉनची आॅनलाइन नोंदणी सुरु
Phaltan Marathon रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किलोमीटरची अनोखी वॉकथॉन हे या मॅरेथॉनचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे.

Phaltan Marathon: ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ दि. 25 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली असून यंदा या मॅरेथॉनचा दशकपूर्ती सोहळा आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असल्याची माहिती प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यातून वाढणाऱ्या विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता सजाई गार्डन येथून या आरोग्य चळवळीचा शुभारंभ होणार आहे. ‘Run for Health & Happiness’ ही यंदाच्या मॅरेथॉनची संकल्पना असून, ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणाईपर्यंत तसेच बालकांनाही आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त अवयवदानाचा संदेशही या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघा प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची ३ किलोमीटरची अनोखी वॉकथॉन हे या मॅरेथॉनचे सर्वात मोठे आकर्षण ठरणार आहे. अशा प्रकारची वॉकथॉन देशात प्रथमच होत असल्याचा आयोजकांचा दावा आहे. मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा विविध अंतरांच्या शर्यती होतील. १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ ते ६४ अशा चार वयोगटांमध्ये स्पर्धा होणार आहे. याशिवाय १२ वर्षांवरील सहभागींसाठी ३ किलोमीटर फन रन, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किलोमीटर वॉकथॉन होणार आहे.
चारही मुख्य वयोगटांमध्ये पुरुष व महिला अशा स्वतंत्र गटांतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके असून, एकूण ६० पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक रनरला टी-शर्ट, टाइम चिपसह बिब, कॅप, एनर्जी बार आणि उपयुक्त सरप्राईज गिफ्ट असलेले मॅरेथॉन किट देण्यात येणार आहे. मॅरेथॉनचा मार्ग ऊसाच्या शेतांमधून आणि द्राक्षबागांच्या परिसरातून जाणारा नयनरम्य असल्याने सहभागींसाठी हा अनुभव विशेष ठरणार आहे. मार्गावर पाण्याची व्यवस्था, रनपूर्व झुंबा वॉर्मअप तसेच रननंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. २१, १० आणि ५ किलोमीटर शर्यतीसाठी पुरुषांसाठी ७५० रुपये अधिक कर, महिलांसाठी ५०० रुपये अधिक कर, तर ३ किलोमीटर फन रनसाठी ३०० रुपये शुल्क आहे. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ किलेमीटर वॉकथॉनमध्ये नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सुरु झाली असून ३० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
फलटणकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य, आनंद आणि व्यायामाची ही चळवळ आपल्या घराघरांत पोहोचवावी, असे आवाहन डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. प्राची प्रसाद जोशी व जोशी हॉस्पिटल प्रा. लि. च्यावतीने करण्यात आले आहे.





