Agriculture : नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; अधिकारी थेट शेतात येऊन करणार पिकांचे सर्वेक्षण
दुष्काळामुळे करपलेल्या उभ्या पिकांची पाहणी; महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे करणार सर्वेक्षण

Agriculture : दुष्काळामुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पिकांच्या नुकसानीचे थेट शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिले आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे ही पाहणी करणार आहेत. त्यामुळे नियमांनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ज्या भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपली आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. बळीराजाला नियमांनुसार आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Agriculture)
महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी संयुक्तपणे हे सर्वेक्षण करतील. संपूर्ण पाहणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना निश्चित मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.





