पुणे जिल्हा | खेडचा राजकीय संन्यास केव्हा मिटणार?

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला खेड तालुका राज्यातील मंत्रीपद, खासदार अशा विविध पदांपासून मात्र दूरच असल्याचे चित्र आजपर्यंत पाहायला मिळत आहे.
स्व. आमदार नारायणराव पवार यांनी सलग 20 वर्षे या विधानसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व राखले त्यानंतर त्यांचा पराभव करत दिलीप मोहिते यांना 15 वर्षे विधानसभेवर खेड तालुक्यातील जनतेने पाठवले स्व. नारायण पवार यांच्या आधीही अनेक आमदार हे काँग्रेसच्याच विचारांचे राहिले तरीही खेड तालुक्याला ना काँग्रेसकडून, ना राष्ट्रवादीकडून, ना इतर पक्षांकडून राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली.
फक्त मंत्रिपदच नव्हे तर आधी अस्तित्वात असणारा खेड लोकसभा आणि आत्ताचा शिरूर लोकसभा यातही संधी न मिळाल्याने खेड तालुक्याची जनता खासदारकीच्या उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.
येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे, त्यातच महाविकास आघाडीकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे चित्र आहे तर महायुतीकडून अनेक उमेदवारांची नावे पुढे येत असल्याने नेमका उमेदवार कोण असणार? आणि ही जागा महायुतीतील कोणता घटक पक्ष लढणार यावर एकमत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, त्यामुळे महायुतीतून खेड तालुक्याला संधी मिळणार का? आणि जर मिळाली तर ती कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मंत्रिपदापासूनही वंचितच
शिरूर लोकसभेमध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हडपसर, भोसरी आणि खेड-आळंदी विधानसभेचा समावेश होतो; मात्र आजपर्यंत खेड-आळंदी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस व काँग्रेस विचारांच्या पक्षाकडून ना खासदारकी ना मंत्रिपद मिळाल्याने येणार्या 2024 च्या निवडणुकीमध्ये खेड तालुक्यातून उमेदवार दिला जाणार का असा सवाल तालुक्यातील जनता विचारत आहे.
वाट्याला कायम दुजाभावच
पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, पिंपरी, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, मावळ या तालुक्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दरम्यान, खेड तालुका प्रथम काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सरकारच्या मागे राहिला. मात्र, सरकारकडून तालुक्याचा कधीही मंत्रिपदासाठी विचार झालेला नसल्याने हा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी दुजाभाव नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ही दबक्या आवाजात चर्चा
आमदार दिलीप मोहिते पाटील 2004 ते 2014 सलग दोन टर्म आमदार राहिले मात्र हॅट्ट्रिकच्या वेळी 2014मध्ये सुरेश गोरे यांनी त्यांचा पराभव केला. तर 2019मध्ये पुन्हा आमदार मोहिते राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले. यावेळी राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले .
आता राजकीय नाट्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीत आला पण पुन्हा दिलीप मोहितेंना मंत्रिपदापासून डावल्याने खेड तालुका अस्वस्थ आहे. दरम्यान, लोकसभेचे वारे जोरदार वाहत असून आमदार दिलीप मोहिते यांना केंद्रात पाठविण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले तर खेडवासीयांना थोडासा दिलासा मिळेल, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.





