Sanjay Raut : “काही बंडखोर खासदार संपर्कात, ते घाबरले आहेत..”; संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य
पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी इशारा दिला की, जे पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाला परत यायचे असेल, तर ते येऊ शकतात.

Sanjay Raut – काही बंडखोर खासदार पक्षाच्या संपर्कात आहेत कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे आणि त्यापैकी किमान दोघांशी सध्या चर्चा सुरू असल्याचा दावा ठाकरेसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी केला.
पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी सांगितले की, जर खासदारांना वाटत असेल की त्यांनी चूक केली आहे, तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते. काही खासदार अजूनही संपर्कात आहेत. आपल्या मतदारसंघातील रोषामुळे ते घाबरले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आता कोणताही गट उरलेला नाही आणि केवळ एकच शिवसेना आहे, ज्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, या विधानावरही राऊत यांनी टीका केली.
त्यांनी शहा यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप केला. केवळ एकच शिवसेना आहे जिचे नेतृत्व सध्या उद्धव ठाकरे करत आहेत, असा दावा त्यांनी केला.
तुम्ही ठाकरेसेनेचा जितका जास्त अपमान कराल, तितकेच राज्यातील लोक तुमच्या विरोधात उभे राहतील. तांत्रिकदृष्ट्या सर्व बंडखोर खासदार अजूनही ठाकरेसेनेसोबतच आहेत.
या प्रकरणात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. तसेच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही ते सामील होत असल्याचे कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
या सहा खासदारांनी ठाकरेसेना सोडल्याचे म्हटलेले नाही, जरी ते पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले, असे राऊत यांनी सांगितले.
‘त्यांनी परत यावे, त्यांचे स्वागत’ – आदित्य ठाकरे
ठाकरेसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बंडखोर खासदारांसाठी पुन्हा एकदा दारे खुली असल्याचे संकेत दिले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन मोठे असल्याने, ज्यांना परत यायचे आहे त्यांचे स्वागतच आहे, असे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना आदित्य यांनी इशारा दिला की, जे पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोणाला परत यायचे असेल, तर ते येऊ शकतात. उद्धवजींचे मन मोठे आहे. पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.





