साताऱ्यातील वाहतूक कोंडीचे मायक्रो प्लॅनिंग कधी ?

सातारा : शहराची हद्दवाढ होऊन तब्बल आठ वर्षे होत आली. कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प आकार घेत असताना वाहतूक आणि दळणवळण साधनांचा मर्यादित विकास झाला आहे. शहरालगतचा रिंग रोड अद्याप प्रस्तावित आहे तर शहरामध्ये उपलब्ध रस्त्याच्या तुलनेने तिप्पट वाहने रस्त्यावर आल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची बजबजपुरी वाढली आहे. शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे मायक्रो प्लॅनिंग करण्याचे सूतोवाच पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले होते. मात्र, अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.
जिल्ह्याचे चार कॅबिनेट मंत्री आहेत. त्याचा फायदा जिल्ह्याच्या विकासाला सुद्धा होत आहे. मात्र, सातारा शहराच्या दृष्टीने दळणवळणाच्या पायाभूत सुविधा आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या होणे गरजेचे आहे. त्यामध्ये सातारा शहराची वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहराच्या बाजूने रिंग रोडचा प्रस्ताव तयार केला आहे.
प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु व्हायची आहे. समर्थ मंदिर चौक, महाराजा सयाजीराव विद्यालय, गोडोली चौक, करंजे नाका, शिवाजी संग्रहालय जुनी इमारत, मार्केट यार्ड परिसर, बस आगार या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर अद्यापही कायमस्वरुपी उपाय झालेला नाही. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर तयार करण्यात आला. पण ग्रेड सेपरेटरमध्ये पाण्याचा निचरा न होणे, चिखल होऊन वाहने घसरणे, पथदिवे बंद असणे यामुळे आणि पावसाळ्यात ग्रेड सेपरेटर बंद ठेवण्याची वारंवार वेळ येत आहे.
या प्रश्नावर पालिकेने सुविधांच्या दृष्टीने आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने नियमनाच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोवई नाक्यावरील महाराजा सयाजीराव विद्यालयासमोर तसेच राजपथावरील कन्या शाळेसमोर होणारी कोंडी चालकांना मनस्ताप देणारी असते. देवी चौकातही वाहतूक कोंडीचा अनुभव येतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक निरीक्षक अभिजित यादव यांनी वाहतूक आराखड्यांचा अभ्यास करून नवीन उपाययोजना लागू कराव्यात. याबाबत नगरपालिका, वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय व नागरिकांची बैठक घ्यावी अशी अपेक्षा आहे .
आराखड्यात उपाय काय?
आराखड्यात वाहतुकीशी संबंधित सर्वच घटकांवर विचार करायला हवा. सिग्नल यंत्रणा सुरू करणे, नवीन सिग्नल बसवणे, झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगची ठिकाणे वाढविणे, पार्किंगचे पट्टे मारणे, दैनंदिन अतिक्रमण निर्मूलन पथक, एकेरी वाहतुकीची प्रभावी अंमलबजावणी, ट्रॅफिक वॉर्डन नेमणे, शाळांच्या भरण्या- सुटण्याच्या दरम्यान कर्मचारी नेमणे, एसटी बसचे मार्ग व इन- आउट गेटमधील वाहतूक अडथळा हटविणे, अनावश्यक रिक्षा थांबे रद्द करणे अशा मुद्यांचा समावेश असावा.
पोलिस रस्त्यावर असूनही कोंडी
वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी वाहन चालवताना स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. बेशिस्त वाहतूक बंद व्हावी. सकाळी दहा ते दोन शहरातील प्रमुख चौकात वाहतूक पोलीस असतात. मात्र, दुपारी दोन ते चार आणि सायंकाळी सातच्या नंतर वाढत्या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसते. बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका, वाढे फाटा, राजवाडा, गोडोली नाका, मोती चौक अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांचे जथ्थे उभे दिसतात. वाहतूक नियमनाऐवजी कोणाला दंड ठोकता येईल, याचाच विचार त्यांच्याकडून सुरू असतो असे अनुभव ऐकायला मिळतात.
पोलिस अधीक्षकांनी तातडीने बैठक घ्यावी
वाहतूक नियमन करताना वाहनचालक व पोलीस यांच्यात बऱ्याचदा वादावादी होते. दंड वसुली करण्यातच पोलीस मग्न असतात, अशी तक्रारही आहे. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी वाहतूक कोंडीसंदर्भात नगरपालिका, पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांची समन्वय बैठक घ्यावी, शी मागणी होत आहे.





