दखल: माणसा कधी होशील रे माणूस?

वसंत बिवरे

“माणसा कधी होशील रे माणूस’ कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेतील ही ओळ आज आठवली तर पुन्हा एकदा माणसाला असे विचारण्याची वेळ आली आहे असे वाटते.

आज माणूस “माणूस’ राहिला नाही. कितीतरी लोक आहेत की ज्यांना पोटभर अन्न, अंगभर वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा देखील मिळू शकत नाहीत. आपला देश निधर्मी आहे असे आपण मानतो. थोडा विचार केला तर प्रश्‍न असा उपस्थित होतो की अठरापगड जाती कोणी निर्माण केल्या असतील? या प्रश्‍नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे माणूस. माणसांनीच स्वत:च्या स्वार्थासाठी जाती निर्माण केल्या असे म्हटले तरी वावगे होणार नाही. म्हणून आता माणसाने कोणतीही जात न मानता फक्‍त “माणूस’ ही जात मानावी आणि तसे वागावे. जसे “एक गाव एक गणपती’ तसे “एक देश, एक जात एक धर्म’ असा कार्यक्रम राबवायला हवा. मग कोणी हिंदू नाही की कोणी मुसलमान नाही. सर्वांची एकच जात आणि ती म्हणजे “माणूस.’ विवाहाचे वेळी फक्‍त स्त्री आणि पुरुष एवढा भेद पाहिला की पुरे. असे झाले तरच जातीवादाला आळा बसेल आणि त्याचबरोबर देशात एकात्मताही सुखाने नांदू लागेल. पायाच्या अंगठ्याला जर ठेच लागली तर डोळ्यात पाणी येते त्याचप्रमाणे पृथ्वीतलावरील कोणत्याही माणसाला दु:ख झाले तर त्याच्यासाठी दुसऱ्या टोकाकडे राहणाऱ्या माणसाच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे. ही खरी एकात्मता. “वसुधैव कुटुंबकम’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे.

आपल्याला राष्ट्रीय एकात्मकता साधायची असेल, देशाची अखंडता टिकवायची असेल तर जातीयतेला मूठमाती द्यायलाच हवी. “माणूस’ हीच जात आणि माणुसकी हाच धर्म हवा. असे झाले तरच राष्ट्रीय एकात्मता अखंड राहील. तसा प्रत्येक धर्म हा श्रेष्ठच आहे. प्रत्येक धर्माची शिकवण ही सारखीच आहे. प्रत्येक धर्म हा सन्मार्गच दाखवतो. माणुसकी सोडून वागा असा कोणता धर्म शिकवतो? कोणताच नाही. मग जाती-जातीत तेढ का निर्माण व्हावी? धर्माची खरी शिकवण काय आहे हे विसरून आपण माझाच धर्म कसा श्रेष्ठ आहे यावर वाद घालीत बसतो. सर्वप्रथम माणसाने “आपण एक माणूस आहोत’ हे विसरता कामा नये. कोणत्याही जातीचा वा धर्माचा माणूस हा प्रथम “माणूस’ म्हणूनच जन्माला आलेला असतो. त्याने माणूस म्हणूच जगायला हवे आणि माणूस म्हणूनच इतरांनाही जगू द्यायला हवे. “अमानुषपणा’ हा तर प्रत्येक धर्मात निषिद्धच मानला आहे.

वास्तविक पाहता निसर्गाने माणसाच्या सुखासाठी केवढा मोठा ऐश्‍वर्याचा खजिना भरून ठेवलेला आहे. निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी म्हटल्याप्रमाणे “जो जे वांच्छिल ते तो लाहो प्राणीजात.’ परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी माणसाने निसर्गसंपत्ती हडप केली. काही जणांकडे अमाप संपत्ती तर काही जणांकडे तोकडी. म्हणूच भेदभाव निर्माण झाला. माणसा माणसात विषमतेची दरी निर्माण झाली. संग्रहवृत्ती वाढली. सर्वांत जास्त मलाच मिळाले पाहिजे ही वृत्ती आली. जे आपल्याला हवे त्याची दुसऱ्यालाही गरज असते हे तो विसरून गेला.

आपल्या टोपलीत दोन भाकरी आहेत; पण शेजाऱ्याच्या टोपलीत एकही नाही. तो उपाशी असेल याचा आपण नको का विचार करायला? आपल्याला आज फक्‍त एकाच भाकरीची गरज आहे मग, उरलेली एक भाकरी आपण शेजाऱ्याला का देऊ नये? कुठे गेली माणसाची ही दातृत्ववृत्ती! आज माणूस स्वार्थाने पूर्ण बरबटलेला आहे. स्वार्थांध माणसाला काहीच दिसत नाही. जर सर्वांना सुखी करायचे असेल तर माणसाने अहंभाव विसरून स्वार्थ त्याग केला पाहिजे. दुसऱ्यासाठी त्याग करायला शिकले पाहिजे. मनात आणले तर तो हे करू शकतो नाही असे नाही. देश सुखी आणि समृद्ध पाहायचा असेल तर हे त्याने करायलाच हवे.

प्रत्येकाला समान अधिकार मिळायलाच हवा. स्त्री-पुरुषाला समान संधी मिळायलाच हवी. त्यांना समान वागणूक मिळालीच पाहिजे. प्रत्येकजण आपापल्या धर्माची ग्वाही मिरवितो; पण त्यामुळे “माणुसकी’ हा खरा धर्मच आपण विसरून चाललो आहोत. वास्तविक पाहता सर्वच धर्म चांगलेच आहेत. प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच आहे; परंतु स्वत:च्या स्वार्थासाठी माणूस धर्माच्या आड लपतो. माणसाने माणसाचा द्वेष करावा असे कोणत्या धर्मात सांगितले आहे? कोणताच धर्म असे सांगत नाही. असे असेल तर आपण एकमेकांचा द्वेष का करतो? जन्मत: कोणताही धर्म वा जात बरोबर येत नाही. जन्मानंतर त्याला जात आणि धर्म सांगितला जातो. प्रथम तो माणूस म्हणून जन्माला आला आहे हे विसरता कामा नये. माणसाला माणूस म्हणूनच जगू द्या. आपण सर्वांनी एकमेकांशी मिळून मिसळून व सभ्येतेने वागले पाहिजे हेच अधिक चांगले नाही का? एकाच घरात वेगळी चूल मांडली तर कोणाला आनंद होईल? “हे विश्‍वची माझे घर’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रूजली पाहिजे. असे जर झाले तरच समाज तरेल आणि समाज तरला तरच देश तरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.