लोणी काळभोर, {बाप्पू काळभोर} – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांबरोबरच इच्छुक उमेदवारांनीही आपापली तयारी सुरु केली आहे. वेगवेगळ्या संस्थांकडून संपूर्ण मतदारसंघाचा सर्व्हे करणे, मतदारसंघातील आपल्या नव्या – जुन्या कार्यकर्त्यां बरोबरच काठावरील मतदारांच्या घरी व त्यांच्या कार्यक्रमांना आवर्जून भेट देणे, विविध तीर्थक्षेत्रांच्या मोफत यात्रा आयोजित करणे आदी कार्यक्रम सध्या जोरदार सुरु आहेत. त्यामुळे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुक जवळ आली आहे हे स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच अशोक पवार यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा आणि मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांना भेट देणे या सर्वांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दुसर्या बाजूला महायुती एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढविणार असे सांगितले जात असले तरी ऐनवेळेस एखादा वेगळाच निर्णय होऊ शकतो. या निवडणूकीत महायुतीच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद उमेदवार असण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे या दोन उमेदवारांबरोबरच शांताराम कटके हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुती, भारतीय जनता पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार राजकीय अनुभवाच्या जोरावर कोणाला उमेदवारी देणार हे ठरण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. हवेलीकरांच्या अस्मितेचा प्रश्न सर्वच इच्छुक उमेदवारांंचा वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत हवेली तालुक्यात संपर्क कमी झाला आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात नेतृत्वाची एक पोकळी निर्माण झाली आहे. या पोकळीचा फायदा घेऊन आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रदीप कंद प्रयत्न करत आहेत. या साठी प्रदीप कंद हवेली तालुक्याची अस्मिता जागृत करण्याचे काम करत आहेत. हवेली तालुक्यावर सुरवातीला पुरंदर तालुका व आता शिरूर तालुका अन्याय करत आहे असे मत ते मांडत आहेत. या म्हणण्याला मतदारांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. हवेली तालुक्याच्या अस्मितेची ज्योत कंद यांनी पेटवली आहे. या ज्योतीला आवश्यक लागणारे इतर साहित्य कंद यांनी पुरवल्यास या ज्योतीचा भडका होऊन वणवा पेटू शकतो. अशोक पवार यांची जमेची बाजू नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी एकहाती यंत्रणा राबवून प्रचार केला. त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना निर्णायक आघाडी मिळाली. प्रदीप कंद यांची जोरदार तयारी प्रदीप कंद हे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भूषवित असलेल्या काळात त्यांनी जाणीवपूर्वक शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील गावांना भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. आलेला माणूस कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे न पाहता त्यांनी कोटयवधी रुपयांचा निधी शिरुर हवेलीत मंजूर केला. या कामांचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. हवेली तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. शिरूर तालुक्यातही जनसंपर्क त्यांनी वाढवला आहे. जनसंपर्क वाढविण्यावर भर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी मोफत तीर्थयात्रे सारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात गेल्या काही वर्षांत मतदारसंघात चांगला जनसंपर्क वाढवला आहे. आगामी निवडणूकीत या जनसंपर्काचा फायदा त्यांना होऊ शकतो. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे व शांताराम कटके यांनीही पक्षाने संधी दिल्यास निवडणुक लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे.