दोन्हीच्या नावांत समावेश होणार फेसबुकचा
वॉशिंग्टन- जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल मिडीया ऍप्स असलेल्या व्हॉटस अप आणि इंस्टाग्रामचा नामविस्तार आता लवकरच पहायला मिळणार आहे. आता या दोन्ही ऍपचं नामकरण होण्यास सुरूवात झालीये. व्हॉट्सअपच्या बिटा व्हर्जनवर “व्हॉट्सअप फ्रॉम फेसबुक’ आणि इंस्टाग्रामच्याही लेटेस्ट व्हर्जनवर “इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ हे नाव दिसत आहे. आगामी आठवड्यात सर्वसामान्य युजर्सपर्यंतही हे नवे अपडेट उपलब्ध होतील. फेसबुकने यापूर्वीच दोन्ही लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचे रिब्रॅण्डींग करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा बदल करण्यात येत असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.
हे दोन्ही ऍप फेसबुकच्या मालकीच्या आहेत. मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या फेसबुकने इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय फोटो शेअरिंग ऍप्लिकेशन 2012 साली विकत घेतले. तर 2014 साली व्हॉट्सअपची मालकीही फेसबुककडे आली. तेव्हापासून या दोन्ही कंपन्या फेसबुकच्या मालकीच्या असल्या तरी संयुक्तपणे काम करत आहेत. पण या दोन्ही ऍपच्या नावामध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख आतापर्यंत नव्हता.
त्यामुळे अनेकांना या दोन्ही ऍपची मालकी फेसबुककडे असल्याची माहिती नव्हती. परिणामी कंपनीकडून फेसबुकच्या नावाचा या दोन्ही ऍपसाठी वापर कऱण्याचा निर्णय घेण्यात आला. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स ऍपचे स्वत:चे वेगळे व्यवस्थापक, कामगार आणि ऑफिस आहेत. ही दोन्ही लोकप्रिय ऍप्लिकेशन्स आपल्या मालकीची आहेत हे दाखवण्यासाठी फेसबुकने त्यांची नावे बदलली आहेत. भविष्यात फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संग्लन करण्याचा कंपनीचा विचार असल्याचीही चर्चा आहे.
दोन्ही कंपन्यांची मालकी घेतल्यानंतर फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर अनेक नवीन फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. फेसबुकने या कंपन्यांना विकत घेतल्यापासून या दोन्ही ऍप्लिकेशनचे वापरकर्ते वाढावेत म्हणून कंपनी विशेष प्रयत्न करत आहे.