Indian Women Team : विश्वविजेत्या महिला संघाला दिली जाणारी Sierra SUV कार कशी असणार? जाणून घ्या

Tata Motors to gift new Sierra SUV Indian Women Team : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यापासून त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. गेल्या ५२ वर्षांत संघाचे हे पहिले विश्वचषक विजेतेपद आहे. आता टाटा मोटर्सने देशाच्या लेकींच्या या यशाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने सर्व खेळाडूंना एक कार भेट देण्याची घोषणा केली आहे, जी आतापर्यंत बाजारात कोणीही सादर केलेली नाही. टाटा मोटर्सची टाटा सिएरा कार लवकरच लाँच होणार आहे आणि प्रत्येक खेळाडूला लाँच लॉटमधून एक कार दिली जाणार आहे. तत्पूर्वी ही टाटा सिएरा कार कशी आहे? जाणून घेऊया.
प्रत्येक खेळाडूला एक टॉप-एंड मॉडेल देणार –
टाटा मोटर्सने घोषणा केली आहे की ते टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला त्यांच्या टाटा सिएरा कारचे टॉप-एंड, सर्वात महागडे मॉडेल भेट देईल. टाटा मोटर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दिग्गज दिग्गजांना भेटतात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स भारतीय महिला क्रिकेट संघ आणि त्यांच्या आयसीसी महिला विश्वचषकातील महान कामगिरीचा उत्सव साजरा करत आहेत. कंपनीने अभिमानाने संघातील प्रत्येक सदस्याला एक खास टाटा सिएरा कार भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.”
Legend Meets Legends.
Celebrating the Indian Women’s Cricket Team and their legendary ICC Women’s World Cup performance, Tata Motors Passenger Vehicles proudly presents each member of the team with the Tata Sierra — a bold, versatile, and timeless legend.@TataCompanies pic.twitter.com/RxT4viRa9p
— Tata Motors Cars (@TataMotors_Cars) November 5, 2025
कशी असणार टाटा सिएरा एसयूव्ही कार?
टाटा सिएरा एसयूव्ही ही टाटा मोटर्सची एक आयकॉनिक कार असून ती २५ नोव्हेंबर रोजी नवीन आणि आधुनिक रूपात बाजारात येणार आहे. जुन्या सिएराचा बॉक्सी, क्लासिक लूक कायम ठेवत, तिला LED लाइटिंग आणि मोठे आकर्षक व्हील्ससह एक दमदार आणि प्रीमियम बाह्यरूप देण्यात आले आहे. ही एसयूव्ही पेट्रोल (१.५L टर्बो), डिझेल (२.०L क्रायोटेक) आणि इलेक्ट्रिक (EV) अशा तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ती आधुनिक ग्राहकांची गरज पूर्ण करेल. EV मॉडेल ५०० किमी पेक्षा अधिक रेंज देऊ शकते. ही एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टोससारख्या लोकप्रिय मॉडेल्सना थेट आव्हान देईल.
१५ लाखांपर्यंत असू शकते किंमत?
नवीन टाटा सिएराचे आतील डिझाइन आणि फीचर्स अत्यंत आधुनिक असतील. यामध्ये मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल २ ADAS (Advanced Driver Assistance Systems) यांसारख्या उच्च-तंत्रज्ञानाच्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. टाटाच्या परंपरेनुसार, ही एसयूव्ही उत्कृष्ट सुरक्षिततेवर भर देईल. प्रशस्त आसनव्यवस्था आणि प्रीमियम फीचर्समुळे ही एक आरामदायक आणि आकर्षक फॅमिली एसयूव्ही ठरू शकते. तिची अंदाजित किंमत ₹१५ लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरू होऊ शकते.





