How did Pratika Rawal get the medal : महिला क्रिकेट विश्वचषकात उत्कृष्ट फलंदाजी करणाऱ्या सलामीवीर प्रतिका रावलला अखेरीस विश्वचषक विजेतेपदाचे पदक मिळाले आहे. गुरुवारी जेव्हा प्रतिका रावल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी पोहोचली, तेव्हा तिच्या गळ्यात हे पदक लटकलेले होते. विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना न खेळल्यामुळे प्रतिकाला सुरुवातीला पदक मिळाले नव्हते. मग त्यानंतर ते कसे मिळाले? जाणून घेऊया. बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात प्रतिका दुखापतग्रस्त झाली होती, परिणामी तिला संघातून बाहेर पडावे लागले होते. आयसीसीच्या नियमांनुसार, संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूला विजेतेपदाचे पदक मिळत नाही. मात्र, आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी प्रतिकाला तिचा हक्क मिळवून दिला आहे. जय शाह यांनी प्रतिकाला मिळवून दिला तिचा हक्क – एका खासगी वाहिनीशी बोलताना प्रतिका रावलने या गोष्टीला दुजोरा दिला की, जय शाह यांच्या प्रयत्नांमुळेच तिला विश्वचषक विजेतेपदाचे पदक मिळाले. प्रतिका रावलने ‘सीएनएन न्यूज १८’ ला सांगितले की, जय शाह यांचा टीम मॅनेजरला मेसेज आला होता की ते प्रतिकाला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हेही वाचा – Jahanara Alam Accuse : बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा; माजी मॅनेजरवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप! प्रतिका म्हणाली, “जय शाह यांनी आमच्या मॅनेजरला मेसेज केला की, ‘मी प्रतिकासाठी पदक आणण्याची व्यवस्था करत आहे’ आणि आता अखेरीस माझ्याकडे पदक आहे. पहिल्यांदा जेव्हा मी विश्वचषक पदक पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी जास्त रडणारी व्यक्ती नाही, पण ते पाहून मी भावूक झाली होते.” प्रतिका रावलचे विश्वचषक २०२५ मध्ये प्रदर्शन – महिला विश्वचषक २०२५ मध्ये प्रतिका रावलने स्मृती मानधनानंतर सर्वाधिक धावा केल्या. या उजव्या हाताच्या सलामीवीराने ६ डावांमध्ये ३०८ धावा केल्या. तिची फलंदाजीची सरासरी ५१.३३ इतकी राहिली. तिचा स्ट्राइक रेट काही प्रमाणात चर्चेत राहिला असला तरी, या खेळाडूने संघाला चांगली सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हेही वाचा – Hasin Jahan Demands : शमी-हसीनचा वाद पुन्हा तापला: १० लाख पोटगीसाठी सुप्रीम कोर्टाकडे धाव विशेष म्हणजे, प्रतिका रावलच्या दुखापतीनंतर जेव्हा शेफाली वर्माची निवड करण्यात आली, तेव्हा तिनेही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम प्रदर्शन केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७८ चेंडूंमध्ये ८७ धावा ठोकल्या, तसेच २ बळीही घेतले आणि ती ‘सामनावीर’ ठरली. हे पदक मिळाल्याने प्रतिका रावलच्या विश्वचषकातील योगदानावर शिक्कामोर्तब झाले आहे.