RCB vs KKR : प्लेऑफच्या शर्यतीत पावसाचा खेळखंडोबा! आरसीबी-केकेआर सामना रद्द झाल्यास काय होणार?

IPL 2025 RCB vs KKR Match Faces Rain Threat : भारत आणि पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आजपासून आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामाला आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याने सुरुवात होणार होती, मात्र पावसामुळे अडथळा निर्माण झाला आहे. शनिवारी आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्याची नाणेफेक नियोजित वेळेवर (सायंकाळी ७ वाजता) होऊ शकली नाही. बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे नाणेफेकीला वारंवार विलंब होत आहे. जर एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? चला, त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊया.
आरसीबी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचणार
जर सामना रद्द झाला तर आरसीबी आणि केकेआरमध्ये प्रत्येकी एक गुण विभागला जाईल. अशा परिस्थितीत, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा होईल आणि संघ १७ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचेल. बंगळुरूचे सध्या ११ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहे. पण, प्लेऑफमध्ये आरसीबीचे स्थान अद्याप निश्चित झालेले नाही. कारण त्यांच्या व्यतिरिक्त, इतर चार संघांनाही १७ किंवा त्याहून अधिक गुण मिळू शकतात.
..तर केकेआर प्लेऑफमधून बाहेर पडणार –
🚨 Update 🚨
The toss has been delayed due to rain. Stay tuned for further updates.#TATAIPL | #RCBvKKR pic.twitter.com/AQzBqFNV6M
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
गुजरात टायटन्सचे १६ गुण, पंजाब किंग्जचे १५, मुंबई इंडियन्सचे १४ तर दिल्ली कॅपिटल्सचे १३ गुण आहेत. लखनौ सुपर जायंट्स देखील १० गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आहेत. त्याच वेळी, जर पावसामुळे सामना रद्द झाला तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरला मोठा फटका बसेल. ज्यामुळे गतविजेत्या केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात येतील. केकेआरने संघाने आतापर्यंत १२ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ११ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. सामना रद्द झाल्यानंतर त्याचे १२ गुण होतील.
हेही वाचा – Roston Chase : रोस्टन चेसच्या हाती कसोटी संघाची कमान: ५०व्या सामन्यात भूषवणार कर्णधारपद!
अशा परिस्थितीत, रहाणे ब्रिगेडने त्यांचा शेवटचा लीग सामना जिंकला तरी त्यांना जास्तीत जास्त १४ गुण मिळू शकतील. सध्या, टॉप-४ संघांनी १४ किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत आणि केकेआरला पुढे जाणे कठीण होईल.टॉप-४ संघांचा नेट रन रेटही केकेआरपेक्षा चांगला आहे. चालू हंगामात केकेआरला एकदा हवामानाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला आहे. ईडन गार्डन्सवर पंजाब किंग्ज विरुद्ध केकेआरचा सामना फक्त एका षटकानंतर रद्द करण्यात आला होता.





