Janhvi Kapoor : हे कसले संस्कार? कल्याणमधील मारहाण प्रकरणावर जान्हवी कपूर संतापली

Janhvi Kapoor : नुकतीच कल्याणमधील नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या मारहाणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या प्ररप्रांतीय आरोपी गोकुळ झा याला पोलिसांनी अटक केली आहे.
मात्र, या घटनेचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे. अशातच कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेवर अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरून स्टोरी शेअर करत घटनेचा तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. हे कसले संस्कार असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
काय म्हणाली जान्हवी?
“या माणसाला तुरुंगात टाकायला हवे. कुणाला या माणसाचं वर्तन ठीक कसं वाटू शकतं? त्याला असं का वाटलं की, तो सहज एखाद्यावर हात उचलू शकतो? हे कोणत्या प्रकारचं संगोपन आहे, जे तुम्हाला पश्चात्ताप, अपराधीपणा किंवा मानवतेच्या भावनेशिवाय अशा कृती करण्यास प्रवृत्त करते, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
तुमचा मेंदू असंच काम करतोय, हे माहिती असूनही तुम्ही स्वतःसोबत कसं जगताय? हे किती लाजिरवाणं आहे. आणि लाज तर आपल्यालाही वाटायला हवी की, अशा वागण्याचं समर्थन करतोय, शिक्षा नाही. याला शिक्षा झालीच पाहिजे, काहीही कारण नको, अशी संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया जान्हवीने दिली आहे.





