Kalyan Hospital Receptionist Case : रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीच्या छाती-पोटावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण; ‘गोकुळ झा’ला मनसे स्टाईल धडा

Kalyan Hospital Receptionist Case : कल्याणच्या नांदिवली परिसरातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीवर गोकुळ झा या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणात गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रंजीत झा यांना अटक करण्यात आली असून, मनसेचे कल्याण उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे यांनी अंबरनाथच्या नेवाळी परिसरातून गोकुळला ताब्यात घेऊन डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात सुपूर्द केले. या मारहाणीची संपूर्ण घटना रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
नांदिवली येथील खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीने गोकुळ झा याला डॉक्टरांच्या केबिनमध्ये जबरदस्तीने जाण्यापासून रोखले. यावेळी डॉक्टरांकडे काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह उपस्थित होते, त्यामुळे तरुणीने गोकुळला थांबण्यास सांगितले. याचा राग येऊन गोकुळने तिच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या मारहाणीत तरुणीचे कपडे फाटले आणि तिला गंभीर दुखापत झाली. तिच्या मानेवर, छातीवर आणि पायांवर मारहाणीचे गंभीर वळ आढळले आहेत.
डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
जानकी रुग्णालयाचे डॉ. मोईन शेख यांनी सांगितले की, तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीमुळे तिच्या मानेवर गंभीर इजा झाली असून, तिला मान हलवताना प्रचंड वेदना होत आहेत. तसेच या मारहाणीमुळे तिला पॅरालिसिसचा धोका आहे. सध्या तिला वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
या घटनेनंतर मनसेचे उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे यांनी गोकुळ झा याला नेवाळी परिसरातून ताब्यात घेतले. त्यांनी गोकुळला ‘मनसे स्टाईल’ मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. गोकुळचा भाऊ रंजीत झा यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी गोकुळवर गंभीर आरोप केले असून, तो कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात फेरीवाल्यांकडून हप्ते वसूल करत असल्याचा दावा केला आहे. गोकुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर कोळशेवाडी आणि उल्हासनगर परिसरात दरोडा, मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी गोकुळ आणि रंजीत झा यांना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, गोकुळला कठोर शिक्षा व्हावी यासाठी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जाईल. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.





