पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी काँग्रेस भवनात आंदोलन करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घातला. मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका काय आहे, असा जाब आंदोलकांकडून विचारण्यात आला. पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील प्रमुख नेतेमंडळी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, सतेज उर्फ बंटी पाटील, प्रणिती शिंदे, पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. ही बैठक सुरू असताना पुणे शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी काँग्रेस भवनच्या आवारात येऊन घोषणाबाजी करत पटोले यांना घेराव घातला. मराठा आरक्षणाच्या आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरे काढण्याला प्राधान्य दिले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांच्या जाहीर कार्यक्रम किंवा बैठकांच्या ठिकाणी जाऊन आक्रमक पवित्रा घेऊ लागले आहेत. पटोले म्हणाले… गेल्या दहा वर्षांत भाजपने प्रत्येक समाज घटकाला आरक्षणाबाबत आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणीच केली नाही. दिलेला शब्द कधीच पाळला नसून केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. हे सरकार आरक्षण विरोधी आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. आगामी कालावधीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठा आणि ओबीसी समजाच्या आरक्षणाचा तोडगा काढेल, अशी भूमिका नाना पटोले यांनी स्पष्ट केली आहे.