Arya Chavan murder : सासपडे हत्या प्रकरण! मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
सातारा – राजधानी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सासपडे (ता. सातारा) येथील मृत आर्या सागर चव्हाण हिला पोवईनाका शिवतीर्थ येथे श्रध्दांजली वाहण्यात आली. घटनेचा निषेध व्यक्त करत संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, राजधानी मराठा क्रांती मोर्चा व सासपडे ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना सोमवारी (दि. १३) निवेदन देण्यात येणार आहे.
शिवतीर्थावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सासपडे घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मृत आर्या चव्हाणला श्रध्दांजली वाहून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी. जिल्ह्यातील प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. ज्या नराधमाने खून केला त्या नराधमाची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. अशीच घटना ९ ते १० महिन्यापूर्वी सासपडे येथे घडली होती त्याचा तपास अजूनही लागलेला नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास लावला असता तर ही घटना घडलीच नसती, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
आर्या चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी शासनाने फॉस्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर केस चालवावी. संबंधित नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान,सासपडे येथील पिडीत कुटुंबियांची भेट घेवून त्यांना राजधानी मराठी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आधार दिला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पीडित कुटुंबियास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, सोमवारी जिल्हाधिकारी संतोष पाटील व पोलीस अधीक्षक प्रमुख तुषार दोशी यांना सासपडे ग्रामस्थ व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





