राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मराठा क्रांती मोर्चाकडून निवडणूक लढविणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे खेड तालुका समन्वयक तथा खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांची आज बैठक अंकुश राक्षे यांनी राजगुरुनगर येथे घेतली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि राजकारण याबाबत यावर चर्चा झाली त्यानंतर अंकुश राक्षे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत माहिती दिली. यावेळी अॅड. अनिल राक्षे, शंकर राक्षे, दिलीप होले यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे तालुक्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. अंकुश राक्षे म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत आजच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. सरकार आरक्षण देत नसेल आणि अन्याय करीत असेल तर मराठा बांधव आमदार झाले पाहिजेत ते विधानसभेत गेले पाहिजेत तरच मराठा आरक्षण मिळेल. तालुक्यात चाकण एमआयडीसी मध्ये नोकरदार वर्ग मोठा आहे, तो मराठा समाजाचा आहे. खेड तालुक्यात मराठा समाजाचे अडीच लाख मतदार आहेत. त्यातच मनोज जरांगे यांची मोठी सभा झाली होती. त्यानंतर आळंदी येथे पहाटेची सभा, भीमाशंकर दौरा याचा फायदा खेड विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. आरक्षण मिळण्यासाठी तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठी आंदोलने केली. उपोषणे केली त्यामुळे तालुक्यातील मराठा उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळेल. म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मराठा मोर्चातील कार्यकर्त्यांची भूमिका त्यांनी आज येथील मेळाव्यात मांडली. मराठ्यांची संख्या तालुक्यात जास्त आहे. त्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार उभा करावा. अशी मागणी आजच्या बैठकीत झाली. तालुक्यातीळ सर्वच उमेदवार मराठा समाजाचे आहेत; मात्र ते मराठा आरक्षणासाठी आवाज उठवत नाहीत. त्यामुळे जो आरक्षणाबाबत आवाज उठवेल त्याच्या मागे या निवडणुकीत मराठा बांधव जातील असा निर्णय झाला आहे. असे राक्षे यांनी सांगितले. अंकुश राक्षे पुढे म्हणाले, जिथे मराठा समाजाची ताकद जास्त तिथे आम्ही लढणार असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. ज्या मतदार संघातील उमेदवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ आणि जरांगे पाटलांच्या सर्व मागण्याचे समर्थन करू, असे जो उमेदवार लिहून देईल. त्याच उमेदवाराच्या मागे मराठा समाज उभा राहील. असेही त्यांनी स्पष्ट केले. खेड आळंदी विधानसभा मतदार संघात लढण्याची वेळ आली तर मी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. राजकारणाचा मला अनुभव आहे. त्यासाठी माझी रणनीती तयार आहे. निवडून येण्यासाठी ज्या काही रणनित्या कराव्या लागतात त्या सर्व मला अवगत आहेत. त्या पद्धतीची यंत्रणा आणि अनुभवी कार्यकर्ते असल्याने विधासभा निवडणूक जिंकण्यासाठी आमची तयारी झाली आहे. -अंकुश राक्षे, समन्वयक मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका