“त्या गरीब कर्मचाऱ्याचा दोष काय?”; संजय गायकवाडांच्या राड्यानंतर राऊतांचा सवाल

Sanjay Raut | शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात संजय गायकवाड हे कँन्टीन कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आमदार निवासातील कँटिनमधील जे जेवण देण्यात आले, ते खराब असल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. जेवण खराब असल्याच्या मुद्द्यावरून आमदार गायकवाड कँटिनमध्ये गेले आणि तिथल्या कर्मचाऱ्याला जाब विचारला. तसेच त्याला संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून, यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण! हे चित्र खरे असेल तर आपली यावर काही अॅक्शन आहे काय? तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत”, असे म्हणत राऊतांनी मारहाणीचा व्हिडीओही रिपोस्ट केला आहे. Sanjay Raut |
याशिवाय पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही मुख्यमंत्री संबंधित खात्याच्या मंत्र्याला पत्र लिहून तक्रार करु शकत होता. तुम्ही त्या गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्याचा दोष काय?. हे सरकार, त्यांचे आमदार राज्यातले जे दुर्बल आहेत, गरीब आहेत, जे आरे ला का रे करु शकत नाही, त्यांना मारताय. आता विषय त्यांच्या अंगलट आला आहे. त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांवर दोष टाकतील. मुख्यमंत्र्यांनी हा व्हिडिओ पाहिला पाहिजे, ज्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे,” असं संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut |
…तर कारवाई व्हायला हवी
“त्या कर्मचाऱ्याला सभागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तो गरीब आहे. तुमचे आमदार गरीबाला अशा प्रकारे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असतील, तर कारवाई झाली पाहिजे. फक्त आमदारांना 50 कोटी मिळाले. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला डाळ, भात मिळाला नाही. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही मारहाण करण्याआधी विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकत होता”, असं संजय राऊत म्हणाले. Sanjay Raut |
दरम्यान, आमदार निवासातील या घटनेवरून आमदार संजय गायकवाड आणि सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे.
हेही वाचा:
ट्रम्पच्या टॅरिफ इशाऱ्यामुळे बाजार सतर्क ! सेन्सेक्स १५८ अंकांनी तर निफ्टी २५५०० च्या खाली





