Priyanka Gandhi : अडकलेल्या भारतीयांसाठी केंद्राची योजना काय? प्रियांका गांधींचा थेट सवाल
अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा सरकारने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काय पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करावे.

Priyanka Gandhi – पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. युद्धासारख्या गंभीर विषयावर राजकारण करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी सोमवारी पंतप्रधानांवर पलटवार केला. आखाती देशांत अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडे नेमकी काय योजना आहे, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
रविवारी केरळमधील सभेत पंतप्रधानांनी आरोप केला होता की, काँग्रेस आखाती देशांतील भारतीयांना धोक्यात आणणारी धोकादायक विधाने करत आहे. याला उत्तर देताना प्रियांका गांधी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, वरतून बॉम्बवर्षाव होत असताना लोकांचे प्राण धोक्यात आहेत.
अशा वेळी राजकारण करण्यापेक्षा सरकारने लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काय पावले उचलली आहेत, हे स्पष्ट करावे. या मुद्द्यावर संपूर्ण देश एकजूट आहे, परंतु आम्हाला ठोस उपाय हवा आहे, अशी मागणी देखील प्रियांका गांधी यांनी केली.
प्रियांका गांधी यांनी युद्धाच्या आर्थिक परिणामांवरही बोट ठेवले. युद्धामुळे गॅस सिलिंडरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. भविष्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यास सरकार त्याचा सामना कसा करणार? यावर संसदेत सविस्तर चर्चा व्हायला हवी, जेणेकरून आम्हीही आमच्या सूचना मांडू शकू, असे त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी ग्वाही दिली आहे की, ते स्वतः विविध देशांच्या प्रमुखांच्या संपर्कात असून भारतीयांची सुरक्षा ही एनडीए सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मात्र, निवडणुका होत असलेल्या केरळसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोक आखाती देशांत कामाला असल्याने, या मुद्द्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.






