“१८०० कोटींचा जमीन घोटाळा होऊनही गुन्हा दाखल नाही, आणि…” अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया समोर

Sharmila Thackeray And Amit Thackeray | मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आमदार आदित्य ठाकरे पुढे आले. तसेच त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत, शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखल्यानंतरही त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, असे म्हंटले. यानंतर आता अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी प्रभादेवी येथे एका कॅफेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात भाष्य केले. शर्मिला ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याबाबत खोचक टिप्पणी करत, 1800 कोटींचा जमीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही. सध्या खोटं बोला पण रेटून बोला असं काम सुरू असल्याचंही म्हटलं.
निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात
पुढे त्या म्हणाल्या, “मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहेत. पण, आम्ही होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल.”
याशिवाय त्यांनी बिहार निवडणूक, गडकिल्ले, शिवसेना आणि राष्ट्रवादी केस संदर्भात देखील भाष्य केले. बिहारमधील निवडणुकांच्या निकालावर त्या म्हणाल्या, “संकटात कोण उपयोगी असते हे पाहून मतदान केले पाहिजे. बिहारमध्ये मोठ्या संख्येने मतदान झाले आहे, पण आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून मतदान केले पाहिजे. खोट बोला पण रेटून बोला असं काम सध्या सुरू आहे. बिहारमध्ये आकडेवारीनुसार 3.50 कोटी मतदार होते, आणि 7 कोटी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार,” असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं.
शिवसेना व राष्ट्रवादीला आव्हान
“मला सुप्रीम कोर्टालाही प्रश्न विचारायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षांपासून सुरू आहे. सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की, त्यांना वेळच देत नाही. कोणाला बोलायचं हाच प्रश्न आहे. पक्षच बळावून घेतले जात आहेत. आता जानेवारीमध्ये निकाल देणार आहेत, तोपर्यंत निवडणुका होऊन जातात. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय आणि मग तुमच्याकडं कोण पाहणार? निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार? तुम्हाला निवडून येणार अशी खात्री आहे, तर मग तुम्ही मैदानात या आणि निवडणूक लढा,” असे आव्हानही शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला दिले. Sharmila Thackeray And Amit Thackeray |
हेही वाचा:





