Uddhav Thackeray : गरीब मुस्लिमांबाबत भाजपचं धोरण काय? उद्धव ठाकरेंचा वक्फ दुरुस्तीवरून परखड सवाल

मुंबई : बहूचर्चित वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली आहे. वक्फ दुरुस्ती विधेयकाने भाजपचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे पुढे आले आहे. तसेच ईदवेळी या सर्वांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या. आता ढेकर देऊन वक्फ बोर्डाचे बिल मांडले आहे. योगायोग आहे किरेन रिजिजू यांनी हे बिल मांडले. रिजिजू यांनीच गोमांस खाण्याचे एकेकाळी समर्थन केले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, वक्फ बोर्डातील काही सुधारणा चांगल्या आहेत. पण यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. गरीब मुस्लिमांबाबत यांच काय धोरण आहे. ३७० कलमाला आम्ही पाठिंबा दिला होता. काश्मीरमधील अनेक निर्वासित इकडे तिकडे फिरत होते. त्यांना शिवसेना प्रमुखांनी आसरा दिला. ३७० कलम हटवले. किती काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले. त्यांना किती त्यांच्या जमिनी दिल्या. काश्मिर पंडितांना त्यांच्या घरी का जाता येत नाही, यावर त्यांनी उत्तर द्यावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, यांचा जमिनीवर डोळा आहे. देशातील इतिहासात मुस्लिमांचा कळवळा घेणारी भाषण भाजपने केली. अमित शाहपासून सर्वांनी केली. जिनांनाही लाजवेल अशी ही भाषणं होती. हे मुस्लिमांच्या बाजूने आहेत की नाही. मग हिंदुत्वाचं काय झालं? हिंदूत्व सोडलं का? बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमा करण्याची परवानगी दिली होती.
तीच जागा व्यापाऱ्यांसाठी उद्योगपतीच्या खिशात घातली. किरेन रिजिजूपासून सर्व खाली मान घालून बघत होते. हे काय चाललं आहे. मुस्लिमांच्या हिताचे हे बिल आहे का? असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडले की आम्ही सोडलंय? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.




