DC vs RR : मिचेल स्टार्कच्या ‘बॅकफूट नो बॉल’वरून वाद! नक्की काय आहे ICCचा नियम? जाणून घ्या

What is Back foot No Ball DC vs RR match in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये, १६ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. हा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता, ज्यामध्ये दिल्लीने राजस्थानचा पराभव करत आपला पाचवा विजय नोंदवला. मात्र, या सामन्यात ‘बॅकफूट नो बॉल’वरून वाद निर्माण झाला आहे. दिल्लीकडून सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या मिचेल स्टार्कचा चौथा चेंडू पंचांनी नो बॉल घोषित केला, ज्यामुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे आज आपण ‘बॅकफूट नो बॉल’ नियम काय आहे? जाणून घेऊया.
पंचांनी नो बॉल का दिला?
दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये प्रथम गोलंदाजी केली आणि मिचेल स्टार्कने उजव्या हाताच्या फलंदाज शिमरॉन हेटमायरविरुद्ध पहिल्या तीन चेंडूत फक्त ५ धावा दिल्या. चौथ्या चेंडूवर उजव्या हाताचा फलंदाज रियान पराग स्ट्राईकवर आला, म्हणून स्टार्कने ‘राउंड द विकेट’ जाऊ चेंडू टाकला, ज्यावर चौकार मारण्यात आला. पण तिसऱ्या पंचांनी तो नो बॉल असल्याचा संकेत दिला. स्टार्कचा पुढचा पाय क्रीज लाईन ओलांडत नव्हता, तरीही नो बॉल देण्यात आला, ज्यामुळे वाद निर्माण झाला.
#DCvsRR #RRvsDC
Back foot no ball from Mitchell Starc pic.twitter.com/vewbUnZuin— 2012 Yugantham (@2012Yugantham) April 16, 2025
खरंतर, मिचेल स्टार्कच्या बॅकफूटच्या आधारावर तिसऱ्या पंचांनी ‘नो बॉल’ दिला होता. स्टार्कचा मागचा पाय रिटर्न क्रीजच्या रेषेला स्पर्श करत होता, जो नियमांनुसार नो बॉल मानला जातो. या निर्णयाची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्येही झाली आणि सुरुवातीला काही तज्ञांनी त्यावर टीका केली, परंतु नंतर त्यांनी मान्य केले की पंचांचा निर्णय योग्य होता.
हेही वाचा – DC vs RR : दिल्लीच्या बॉलिंग कोचवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
काय आहे नक्की नियम?
क्रिकेटचे नियम बनवणारी संस्था एमसीसी (मेरीलबोन क्रिकेट क्लब) नुसार, नियम २१.५.१: “जर गोलंदाजाचा मागचा पाय रिटर्न क्रीजला स्पर्श करत असेल किंवा ओलांडत असेल तर तो नो बॉल मानला जाईल. गोलंदाजाचा पाय रेषेच्या आत असावा आणि त्याला स्पर्श करू नये.” हे स्पष्ट आहे की पंचांचा निर्णय नियमांनुसार होता आणि दिल्ली कॅपिटल्सवर कोणताही अन्याय झाला नाही.
हेही वाचा – DC vs RR : रोमांचक सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राखलं तख्त! राजस्थानचा सलग तिसरा पराभव
राजस्थान रॉयल्सला घेता आला नाही फायदा –
नो बॉल असूनही, राजस्थान रॉयल्स त्याचा फायदा घेऊ शकले नाहीत. रियान पराग फ्री हिटवर धावबाद झाला आणि पुढच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालही धावबाद झाला. अशाप्रकारे, सुपर ओव्हरच्या ५ चेंडूत राजस्थानने फक्त ११ धावा काढल्या. केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ४ चेंडूत लक्ष्य गाठले.





