Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कची कमाल; अश्विनला मागे टाकत रचला नवा इतिहास, स्टोक्ससाठी ठरतोय कर्दनकाळ!

Mitchell Starc Record against Ben Stokes : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे.या सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इतिहास रचला आहे. स्टार्कने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला बाद करताच भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा एक मोठा जागतिक विक्रम मोडीत काढला आहे.
मिचेल स्टार्कने अश्विनला टाकलं मागे –
मिचेल स्टार्कने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सला खातंही उघडू न देता पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कने बेन स्टोक्सला बाद करण्याची ही १४ वी वेळ होती. यासह त्याने रविचंद्रन अश्विनचा विक्रम मोडला, ज्याने स्टोक्सला १३ वेळा बाद केले होते. आता बेन स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज म्हणून स्टार्क पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
बेन स्टोक्सला कसोटीत सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज:
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया): १४ वेळा
- रविचंद्रन अश्विन (भारत): १३ वेळा
- नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया): १० वेळा
- रवींद्र जडेजा (भारत): ८ वेळा
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi Sixes : ६,६,६,६,६….सिक्सर किंग वैभवचा धुमाकूळ! २१ चेंडूत ठोकले तब्बल १० गगनचुंबी षटकार
रंगना हेराथचा ‘तो’ जागतिक विक्रमही धोक्यात –
मिचेल स्टार्कच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ४३० विकेट्सची नोंद आहे. या सिडनी कसोटीत अजून ४ विकेट्स घेतल्यास स्टार्क श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथ (४३३ विकेट्स) याला मागे टाकेल. असे झाल्यास मिचेल स्टार्क कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी डावखुरा (Left-arm) गोलंदाज ठरेल.
इंग्लंडचा पहिला डाव ३८४ धावांवर आटोपला –
पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ३८४ धावांवर संपला. जो रूटने १६० धावांची मॅरेथॉन खेळी केली, तर बेन स्टोक्स शून्यावर बाद झाला. मिचेल स्टार्कने या मालिकेत आतापर्यंत एकूण २८ विकेट्स घेतले असून तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे.





