Usha Nadkarni : मी झोपेतच मेले तर.! उषा नाडकर्णींनी सांगितली मन हेलावून टाकणारी गोष्ट; मुलगा म्हणतो.. तू मला फक्त जन्म दिलाय
पतीपासून अनेक वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या उषा नाडकर्णी गेल्या १९८७ पासून, म्हणजे तब्बल ३९ वर्षांपासून मुंबईतील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात.

Usha Nadkarni : पडद्यावर कठोर सासू, खलनायिका किंवा दमदार स्वभावाच्या महिलेच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘उषा नाडकर्णी‘ आज वयाच्या ८०व्या वर्षीही तितक्याच खंबीरपणे आयुष्य जगत आहेत.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील त्यांच्या गाजलेल्या भूमिकेपासून ते अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांतील दमदार अभिनयापर्यंत त्यांनी आपल्या कलेची अमिट छाप सोडली. मात्र पडद्यावर कणखर दिसणाऱ्या या अभिनेत्रीचे खरे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले आहे.
पतीपासून अनेक वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या उषा नाडकर्णी गेल्या १९८७ पासून, म्हणजे तब्बल ३९ वर्षांपासून मुंबईतील एका फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. घरातील सर्व कामे त्या स्वतः करतात. मुलगा परदेशात स्थायिक आहे, भावंडांचेही निधन झाले आहे आणि आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्यासोबत कायमची सोबत आहे ती फक्त त्यांच्या धैर्याची.
पतीपासून विभक्त, पण मनात नाही कटुता…
उषा नाडकर्णी वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. मात्र, राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्या पतीपासून खूप आधीच विभक्त झाल्या. तरीही त्यांच्या मनात पती किंवा त्यांच्या कुटुंबाविषयी कोणताही राग किंवा द्वेष नाही. उलट, त्यांनी अनेकदा पतीच्या कुटुंबीयांना घरी जेवणासाठीही बोलावले होते. भूतकाळ विसरून पुढे जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.
मुलगा म्हणतो, “तू मला फक्त जन्म दिलाय”
उषा नाडकर्णी यांचा मुलगा अभिजीत सध्या परदेशात राहतो. मात्र त्याचे बालपण आईसोबत गेले नाही. अभिनय, नाटकांचे प्रयोग आणि सततचे शूटिंग यामुळे उषा नाडकर्णी यांना मुलाला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला.
मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला वेळ मिळेल तेव्हा मी त्याला भेटायला जायचे. एकाच दिवशी अनेक नाटकांचे प्रयोग असायचे. त्यामुळे माझा बहुतेक वेळ रंगभूमीवरच जायचा. आजही माझा मुलगा मला म्हणतो, ‘तू मला फक्त जन्म दिलाय. माझी खरी आई तर माझी आजीच होती.’ हे ऐकताना मनाला खूप वेदना होतात.”
३९ वर्षांपासून एकट्याच आयुष्याचा प्रवास :
१९८७ पासून उषा नाडकर्णी मुंबईतील त्यांच्या घरात एकट्याच राहतात. सुरुवातीला एकटेपणाची आणि सुरक्षिततेची भीती वाटायची. त्या आठवत म्हणाल्या, “जेव्हा मी या इमारतीत राहायला आले, तेव्हा रात्री गार्डला माझ्या दारापर्यंत सोबत यायला सांगायचे. कोणीतरी हल्ला करेल अशी भीती वाटायची. पण आता त्या भीतीवर मी मात केली आहे. एकटं राहण्याची सवय झाली आहे.” आज त्या स्वतःची सर्व कामे स्वतःच करतात आणि स्वावलंबी आयुष्य जगतात.
“जर मी झोपेतच मेले तर…”
एकटेपणामुळे मृत्यूबद्दल विचार मनात येतात का? या प्रश्नावर उषा नाडकर्णींनी अतिशय शांतपणे उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “आपण कसे मरणार हे कुणालाच माहीत नसते. काही जण झोपेतच जातात, काही रुग्णालयात. मला मृत्यूची भीती नाही. जर मी झोपेतच मेले, तर शेजारी दरवाजा ठोठावतील आणि म्हणतील, ‘आज म्हातारीने दरवाजा उघडला नाही.’ एवढंच.” त्यांच्या या वक्तव्याने अनेक चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आले.
उषा नाडकर्णींचा सिनेप्रवास :
उषा नाडकर्णी या मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अत्यंत अनुभवी अभिनेत्रींपैकी एक आहेत. रंगभूमीपासून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. मराठी नाटकांमधील प्रभावी अभिनयामुळे त्यांना चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये संधी मिळाली.
मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतील कडक स्वभावाच्या सावित्री देशमुख (सासू) या भूमिकेमुळे त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या.
याशिवाय त्यांनी विविध मराठी मालिका, चित्रपट आणि हिंदी सिनेमांत आई, सासू तसेच खलनायिकेच्या अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. अभिनयातील सहजता, दमदार संवादफेक आणि वास्तववादी भूमिका हे त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य मानले जाते.






