Kareena Kapoor Birthday: ‘सिद्धिमा’पासून ‘बेबो’पर्यंतचा भन्नाट प्रवास; डेब्यू फिल्मही शूटिंगच्या काही दिवस आधी सोडली!
Kareena Kapoor Birthday करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी रणधीर कपूर आणि बबिता यांच्या घरी झाला. ती राज कपूर यांची नात आहे.

Kareena Kapoor Birthday: करीना कपूर खान आज, 21 सप्टेंबरला आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘बेबो’ या नावाने प्रसिद्ध असलेली करीना कपूर गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. कपूर घराण्यात जन्मलेल्या करीनाने आपल्या अभिनयाने आणि हटके व्यक्तिमत्त्वाने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेऊया.
राज कपूर यांनी ठेवलं होतं ‘सिद्धिमा’ नाव
करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी रणधीर कपूर आणि बबिता यांच्या घरी झाला. ती राज कपूर यांची नात आहे. विशेष म्हणजे राज कपूर यांनी तिचं नाव ‘सिद्धिमा’ ठेवलं होतं. मात्र, तिची आई बबिता यांनी ‘अॅना कॅरेनिना’ या पुस्तकापासून प्रेरणा घेत तिचं नाव ‘करीना’ ठेवलं.
अभिनयासाठी सोडलं शिक्षण
करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूल आणि देहरादूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर तिने मिठीबाई कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेतलं. तिने हार्वर्ड समर स्कूलमधून मायक्रो कॉम्प्युटरचा तीन महिन्यांचा कोर्सही केला. पुढे तिने मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने शिक्षण मध्येच सोडलं. एका मुलाखतीत तिने आपण 11वीपर्यंतच शिक्षण घेतल्याचं सांगितलं होतं.
डेब्यू फिल्म शूटिंगच्या काही दिवस आधी सोडली
करीनाच्या बॉलिवूड डेब्यूची गोष्टही तितकीच खास आहे. राकेश रोशन यांच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांना लॉन्च करण्याची योजना होती. करीनाने या चित्रपटाचं शूटिंगही सुरू केलं होतं. मात्र, काही सीन शूट केल्यानंतर तिची आई बबिता आणि राकेश रोशन यांच्यात चित्रपटातील भूमिकेवरून मतभेद झाले. करीनाच्या भूमिकेला पुरेसं महत्त्व मिळत नसल्याचं बबिता यांना वाटलं आणि त्यांनी करीनाला या चित्रपटातून बाहेर काढलं.
यानंतर करीना ‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून अभिषेक बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये दाखल झाली. हा चित्रपट जे. पी. दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. दुसरीकडे ‘कहो ना प्यार है’ सुपरहिट ठरला आणि अमीषा पटेल रातोरात लोकप्रिय झाली.

Kareena Kapoor
शाहिदपासून सैफपर्यंत
करीनाचं वैयक्तिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं. तिचं नाव सुरुवातीला ऋतिक रोशनसोबत जोडलं गेलं. त्यानंतर ती अभिनेता शाहिद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. मात्र, नंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ अली खान जवळ आले. दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केलं.
आई झाल्यानंतरही करिअर सुरूच
करीनाने लग्न आणि आई झाल्यानंतरही अभिनय सुरू ठेवला. 2016 मध्ये तिने तैमूरला जन्म दिला. त्यानंतर 2021 मध्ये तिचा दुसरा मुलगा जहांगीर म्हणजेच जेहचा जन्म झाला. मुलांच्या नावांवरून सोशल मीडियावर चर्चा झाली होती. मात्र, करीनाने कामातून ब्रेक घेतला नाही.
‘चमेली’, ‘जब वी मेट’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘तलाश’, ‘बजरंगी भाईजान’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘क्रू’ अशा अनेक चित्रपटांमधून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘जाने जान’मधून तिने ओटीटीवरही पदार्पण केलं.
अनेक मोठे चित्रपटही नाकारले
करीनाने आपल्या कारकिर्दीत काही मोठे चित्रपट नाकारल्याचंही सांगितलं जातं. ‘कहो ना प्यार है’, ‘कल हो ना हो’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ यांसारख्या चित्रपटांच्या ऑफर्स तिने सोडल्या होत्या.
आज 46 वर्षांची झालेली करीना कपूर खान अजूनही बॉलिवूडमधील चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. ‘सिद्धिमा’पासून सुरू झालेला तिचा प्रवास ‘बेबो’पर्यंत पोहोचला आणि आज ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.





